Wednesday, April 25, 2012

गदिमा


एकनाथां प्रमाणे  माडगूळकर हा सर्व पेठांचा कवी . भागवता पासून भारुडा पर्यंत नानापरीन्च्या गीतांचा तो एक जसा जनक होता तसेच  माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी छुमछुमत असते.
देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो. एखादी नात आजीला गीत-रामायण एकवत असते. एखाद्या विजानात तरुतळी एक वहि कवितेची घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी युवती माडगूळकरांचे गीत गात असते; आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समर गीतांच्या धुंदीत पावले टाकत असतात. कवीच्या हयातीतच त्या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभले. माडगूळकरानच्या कढत लावणीचा चटका बसलेले एक गृहस्थ चिडून मला म्हणाले होते , कि " माडगूळकरांनी असल्या फक्त लावण्याच लिहाव्यात ! मी सांगतो , 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम ' सारखी एक ओळ माडगूळकरांना लिहिता येणार नाही . असल्या तेजस्वी कवी कडे जाऊन शिका म्हणावं ! "
"ते शक्य नाही , " मी म्हणालो
"का ?"
"कारण 'वेदमंत्राहून आम्हा ' हे गीत सुद्धा ग.दि माडगूळकरांचं च आहे ."

संत-शाहीरां नंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पहाण्यात नाही . सामान्य आणि असामान्य, दोन्ही प्रतींच्या रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कवी आहे.
कवी म्हणजे माडगूळकर हेच  समीकरण आहे. त्यांचे गीत-रामायण ऐकणाऱ्या श्रोत्यांना तर ह्या कवीला आणि गायक सुधीर फडक्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले आहे . त्यांना प्रतिसाद मिळतो तो 'पुंडलिका वरदा ' म्हटल्यावर हजारोंच्या मुखांतून ' हाऽऽरि विठ्ठऽऽल ' उमटतो तसा ! आईने दुधा बरोबर ओवी पाजून वाढवलेला हा कवी आहे . आता उमलतात ती त्या शुध्द देशी संस्काराची फुले.

( पुलं नी गदिमांच्या  गीतसौभद्र ह्या  गीतकाव्य - संग्रहाला(१९६८) लिहिलेल्या प्रस्तावनेतून साभार )

No comments: