Wednesday, February 29, 2012

क्विक मार्च


मार्च महिना एकंदरीत बराच व्यस्त व महत्वाचा ठरणार आहे ! क्रिकेट , राजकारण , अर्थ व्यवस्था ह्या सर्व स्थरा  वर घटना अपेक्षित आहेत ...
उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार १ तारखेला संपला कि राजकीय ढवळा-ढवळी  ला सुरवात होईल. 
उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुका देशातील अनेक समीकरणे बदलणार्या ठरतील असे वाटते . शेवटचा व ७वा टप्पा ३ मार्च ला उरकला कि देशाचे लक्ष ६ मार्च च्या मतमोजणी व निकाला कडे लागलेले असेल. महाराष्ट्रात भाजप शिवसेने ला राम राम म्हणण्याच्या तयारीत आहे ! नासिक , मुंबई व इतर महापौर पदाच्या निवडणुकीत बरेच से चित्र स्पष्ट होईल.
राजकारण आणि देशाच्या अर्थ कारणा साठी  संसदेचे अर्थ संकल्पीय अधिवेशन अतिशय महत्वाचे ठरू शकेल.

२ मार्च चा ओस्ट्रेलिया-श्रीलंका सामना हा भारताच्या क्रिकेट साठी महत्वाचा ठरू शकतो. ८ तारखेला होळी च्या दिवशी लोक कोणाच्या नावाने बोंबा मारतील हे ह्या सामन्या वर अवलंबून आहे !

५ ते १६ मार्च ह्या कालावधीत : केंद्रीय अर्थसंकल्प , महाराष्ट्रातील महापौर पदाच्या निवडणुका , उत्तर प्रदेशातील विधान सभा निवडणुकांचे निकाल , क्रिकेट च्या सी बी कप ( ऑस) व एशिया कप ( बांगलादेश) ह्या स्पर्धा , होळी, धुळवड, रंगपंचमी .. आणि पुढे २३ तारखेला पाडवा ... बोलता-बोलता पुढचे वर्ष उभे राहणार .. असा मार्च घोड दौड करणार आहे ! व्हा तैयार !


Monday, February 27, 2012

किंगफिशर ची साहित्याला देणगी



किंग फिशर हि खरं म्हणजे माझी  आवडती एअर लाईन होती ... तिथे अनेक युवकांना आणि मनानी सदैव तरुण असणार्यांना "एयर " हि मिळायची आणि "लाईन" हि.. 
इंडिअन ऐअर लाईन्स आणि जेट च्या "बर्ण्यान" पुढे लाल , तंग स्कर्ट मधील किंगफिशर च्या हवाई सुंदर्या नावाला साजेश्या होत्या. तेवढ्या साठी अनेक मंडळी प्रवासाचे बेत आखायची ... किंगफिशर च्या हवाई पर्यांची फिगर बघत , टीव्ही च्या पडद्या वर दिसणाऱ्या   दाढीवाल्या गलीच्च्छ  मल्या कडे दुर्लक्ष करणे सहज शक्य होते.    २००४ - २००८ पर्यंत किंगफिशर चं भाडं हि अगदी माफक असायचं ! बहुतेक म्हणूनच किंगफिशर ची आजची स्थिती उद्भवली असावी ! आज किंगफिशर बुडीत निघाली आहे त्याचे दुखः आहेच पण त्या मुळे पुणेरी मराठी ला अनेक शब्द प्रयोग भरभरून मिळाले आहेत ह्यात आनंद हि आहे ! मराठीत आलेले काही नवे शब्दप्रयोग ...

सदैव  किंगफिशर मध्ये बसलेला इसम = बाता मारणारा एखादा "सोश्यल एक्स्पर्ट " , नेहमी २०००० फुटावरून उडणारा एक किडा 
उदा :   अण्णू परांजप्या सदैव किंगफिशर मध्ये बसलेला असतो !

"के एफ"  गिरी करणे : माहिती नसताना धंद्यात पडणे , नाक खुपसणे ,माहिती नसताना एखाद्या विषयावर बोलणे
उदा :  अण्णू परांजपे चा लबाड मुलगा दिवस-रात्र ट्विटर आणि फेसबुक  वर "के एफ गिरी " करत असतो !
संबंधित शब्द प्रयोग :  झारापकर गिरी करणे : उगाचच झेपत नसलेले काम हाती घेणे
( क्षितीज झारापकर : कुप्रसिद्ध गोळा बेरीजकार)


धंद्या चा किंगफिशर होणे= बुडीत निघणे  
उदा :  अण्णू गोगट्या च्या दुकानाचे किंगफिशर झाले !

किंगफिशर सारखी लाल करणे = काही कारण नसताना उगाचच पुढे पुढे करणे
उदा :  रानड्यांची सोनाली नेहमी सार्वजनिक समारंभात सगळीकडे किंगफिशर सारखी लाल करत असते !

किंगफिशारी ( ठाकरी भाषे प्रमाणे) : नुसती बोलबच्चन गिरी करणे , वायफळ चर्चा करणे 
उदा :  अमेरिकेतील लेले आणि पुण्याचे परांजपे हे पुणे म न पा च्या होऊ घातलेल्या निवडणुकांन बद्दल ..डेक्कन जिमखान्या वर अर्धी- अर्धी कॉफी चेपत  किंगफिशारी करत होते !


किंगफिशर : भरपूर मेक अप व खलास टंच कपडे घातलेलेली  तरुणी  
उदा :  अरे दिलप्या ...तो पक्या म्हणत होता फर्ग्युसन ला आणि बी एम ला निस्ता किंगफिशर चा घोळका असतो !

एक म्हण :
नावाची टीचर... आहे खरी किंगफिशर 
अर्थ : विषयाचे ज्ञान नसलेली , पण चांगली फिगर असलेली आणि टंच कपडे घालणारी एखादी शिक्षिका / लेक्चरर 





आज मराठी भाषा दिवस


आज मराठी भाषा दिवस ... माझ्या मनातलं सगळं ..थोडक्यात  विदेश यांच्या  लेखन प्रपंच वरील चार ओळीतून व्यक्त होत आहे...


सुरेख उत्तम वा वा छान
 म्हणत वाहवा करू -
 जमेल तेथे मायमराठी
 आपण जवळ करू !

                                          मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस !
                                          मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया !
                                          मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक !
                                          मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब !
                                          मराठी नेता गरजला- व्हेरी गुड !
                                          मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! 

भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी           

आज मराठी भाषा दीन
आज मराठी भाषा दिन !




Friday, February 24, 2012

त्याला जीवन ऐसे नाव


दोन घडी चा डाव ..
त्याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे  आपण
रंक  आणिक राव


माळ यशाची हासत घालू
हासत हासत असेच झेलू
पराजयाचे घाव
झेलुया पराजयाचे घाव
त्याला जीवन ऐसे नाव


Thursday, February 23, 2012

परिस्थिती



माणसावर परिस्थिती कधी कधी इतकी वाईट येते कि,
'हा माणूस तुटून जाईल कि काय?' अशी भीती निर्माण होते.
सगळे मार्ग बंद होतात,वाट दिसेनाशी होते,
मिळालाच एखादा मार्ग तर त्या मार्गातल्या काट्यांतून रक्तबंबाळ झाल्यावर 'तो मार्ग चुकीचा होता'
याची प्रचिती येते....'दुष्काळातला तेरावा महिना म्हणजे काय ते कळतं'
आठवण,दु:ख,गरिबी,अपयश हे सगळे गुंड एकाच वेळी एकाच माणसावर चाल करून येतात.
सगळं काही निराशवादी झालं कि, 'आता काही इलाज नाहीयेय' याची खात्री आधीच झालेली असते.
अश्या परिस्थितीत थोड्या वेळासाठी स्वतः त्या सर्व परिस्थितीतून बाहेर उभं राहायचं,
आणि
उभं राहून परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करायचं...
खरंच परिस्थिती कधीकधी 'Standing Ovation' साठी हकदार असते..
म्हणायचं कि,
"वाह.....परिस्थिती यावी तर अशी यावी....
एखाद्याची गळचेपी करावी तर अशी करावी....कोंड करावी तर अशी करावी.
एक मार्ग...एक मार्ग मोकळा नाही सोडायचा."
आणि परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करून झालं कि,
शेवटी स्वतःच स्वतःचं कौतुक करायचं कि,
"आपल्याकडे गमावण्यासारखं इतकं काय काय होतं,
आपल्याला झुकवण्यासाठी परिस्थितीला पण इतके कष्ट करावे लागले.
आपणही इतके अफाट आहोत..."
दु:खाच्या दरबारात वास्तव आणि मृगजळ उघडं पडतं....

व पु 






Wednesday, February 22, 2012

हवाहवासा वाटणारा एकटेपणा



माणसाचं मनच मोठं विचित्र...

त्याला एकटेपणा नकोसा असतो... पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो...

कितीही नाही म्हटलं ना तरी जीवनाचा अर्थ त्याला त्या एकांतातच मिळतो... कारण गर्दीत जरी तो स्वतःला हरवायला शिकत असला ना तरी एकांतात तो स्वतःला सापडायला शिकतो... अन तसं बघितलं तर एकटा नसतो कोण हो... सगळे एकटेच असतात... सोबती मिळतात ते फक्त काही क्षणांपुरते... कारण प्रत्येकाच गंतव्य वेगळं असतं... अन ज्याच त्याचं गंतव्य आलं ना की मग ते त्यांच्या स्वतंत्र वाटेवर निघून जातात... अन मागे राहतो फक्त आपण... 'एकटेच' !!!




व पु






Monday, February 20, 2012

अहंकाराचा पहारेकरी



कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम प्रथम संवाद करावासा वाटतंच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवत की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वताचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते ह्याचा अर्थच काय? 

वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणिवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एके काळी मैत्री झाली होती ती कारणे, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ, आमंत्रण देत राहतो, पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करत राहतो.

त्या कोण्या एका व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कस? हा एकमेव प्रश्न, अहंकार विचारत राहतो. मग अट्टाहासाने वैर जोपासले जाते. अट्टाहासाने संगोपन केलेले वैर जास्त थकवते. ही सहनशक्तीची कसोटी असते. ह्याचाच जास्तीचा थकवा असतो.

पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडले की अहंकाराची शक्ति कमी होत जाते. त्या र्मैत्रित शब्दांचा प्रवास सुरु झाला की अधून मधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वताची लाज वाटते. पण इथेही पुन्हा शब्द विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड़,संकोच,अबोला.... ही एक एक वस्त्र उतरवली जातात..... फाटक कायमचे उघडले जाते.

वपुर्झा -- व. पु. काळे

Saturday, February 18, 2012

मराठी पण भारतीय





मी भारता बाहेर अनेक वर्षे राहीलो . तिथे माझी ओळख फक्त भारतीय म्हणून होत होती. पण खरं तर माझ्या खर्या "स्वतः " ची ओळख हि मला माझ्यातील संस्कृतीतूनच जाणवत होती. मी भारतीय आहे हे मला माझ्या तील मराठीपणा तूनच जाणं वत होतं !
हि  सांस्कृतिक जडण घडण : मग ते ग दि मा , पु ल, व पु  असोत किंवा एखादे बडबड गीत असो, ज्ञानबा -तुकाराम - एकनाथांचे एखादे लहानशा ओवी मध्ये लपलेला जीवनाच अर्थ असो किंवा सुधीर मोघे ,संदीप खरे सारख्या एखाद्या कवीच्या काळजाला लागलेल्या दोन ओळी असोत ... माझे भारतीयत्व मला माझ्या भाषा-संस्कृती मुळेच जाणवते.
मला माझ्या संस्कृतीशी - आवडणार्या भाषेशी एकनिष्ठ राहून स्वतः ची ओळख भारतीय म्हणून सांगण्याची मुभा आहे . मग मी मराठी असेन , बंगाली असेन , गुजराती असेन किंवा आणिक कोणी .. त्या त्या भाषा संस्कृती शी  एकनिष्ठ राहून हि मी भारतीय म्हणून अभिमानाने ओळख सांगू शकतो ... हे असे आहे म्हणून ह्या अनेक  रंग- रूप- वेश- भाषेत ,  विविधतेत भारतीय असल्याची एकता  आहे .
मला माझ्या भाषा-संस्कृती शी प्रेमाने  ,आनंदाने एकनिष्ठ राहण्याचे स्वातंत्र्य  इथे आहे .. त्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदाने, बेडर पणे उपभोग घेणार्यांची मांदियाळी म्हणजेच स्वतंत्र भारत !
माझ्यातील "मराठी पण " हे मला एक भारतीय असल्याची  जाणीव करून देत आहे. 
आणि ...बहुतेक म्हणूनच मी भारतीय आहे.


Thursday, February 16, 2012

महाराष्ट्रातील महत्वाच्या निवडणुका


१६ फेब ला होणार्या नगरपालिका निवडणुका ह्या महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाच्या ठरणार आहेत. २००५ साली स्थापन झालेला पक्ष  " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " हा महत्वाची भूमिका बजावणार आहे.
राज ठाकरे सारखे युवा पण कसलेले मजबूत नेतृत्व महाराष्ट्रा ला मिळत आहे. म न से हा दूरदृष्टी असलेला पक्ष आहे. खंबीर नेतृत्व आणि समाजकारण समजणारा पक्ष आहे.
२०१४ साली होणार्या विधानसभा निवडणुकांची नांदी महापालिकेच्या निवडणुकांन मधून होणार आहे. पुणे , नासिक , ठाणे  आणि मुंबई मध्ये मनसे आपले आस्थित्व दाखवून देईल.
मोडकळीस आलेले जुने पक्ष आणि सेना यांना लवकरच त्यांची जागा दिसेल. नावानी " राष्ट्रवादी " पण अस्सल "जातवादी" पक्ष आज ना उद्या त्याच्या सीमित वर्गा पुरता उरेल. राष्ट्रीय पातळी वर भाजप आणि काँग्रेस , तर महाराष्ट्रात मनसे असे झाले तर नक्कीच महाराष्ट्राचे आणि राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात काहीही शंका नाही.


आज होणार्या निवडणुकीत , मनसे हा एक मुख्य पक्ष म्हणून पुढे येईल . सत्तेचे समीकरण करताना मनसे कडे दुर्लक्ष करून कुठला हि पक्ष सत्ते वर येणे अवघड आहे. मनसे ची घोड दौड २०१२ च्या महानगर पालिके च्या निवडणुकीतून सुरु होईल हे नक्की. 
युवा आणि कसलेले नेते राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहे. त्यांना अनेक शुभेच्छा !





Friday, February 10, 2012

"गोळा बेरीज" माझी प्रतिक्रिया



" गोळा बेरीज " पाहून आलो ... प्रतिक्रिया देणे  अवघड वाटते आहे .. पण प्रयत्न करणार आहे...
आतुरतेने ह्या सिनेमा ची वाट पाहत होतो ... त्या मुळे थोडंसं हिरमुसले पण जाणवतंय .
अपेक्षा भंग झाला असं म्हणणं बरोबर नाही ...कारण पुलंचं साहित्य इतकं वजनदार आहे कि वेळ फुकट गेला असं वाटलं नाही.

राव साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर " ह्या क्षितीज झारापकर नावाच्या दिग्दर्शकाने उगाचच उंटाच्या बुडाला शिवण्याचा प्रयत्न केला आहे. सुमार दर्जा च्या ह्या दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य का हाताळले हे कोडं आहे. त्याने कुठल्या तरी चांगल्या गुरु कडे जाऊन त्यांचे पाय धरावे आणि शिक्षणास सुरवात करावी हे बरे ! "

दोन आयटम नंबर ह्या सिनेमात टाकण्याची काय गरज होती हे समजले नाही. त्यांचा दर्जा हि टुकार होता.. 

एखाद्या शाळकरी मुलांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे काय असं सारखं सिनेमा पहाताना वाटत रहातं. कास्टिंग  बद्दल बोलायचे झाले तर मूळ लेखकांनी वर्णन केलेल्या व्यक्ती रेखा आणि निवडलेले कलाकार ह्यात खूप फरक वाटला.  

सुबोध भावे ने केलेला नंदा प्रधान आवडला. 
सखाराम गटणे हा "एकारांत" बावळट आणि उंच वाटतो ... तो तसा पुलं नि व्यक्ती रेखान्कला नाहीये. तो गहूवर्णी , बुटका हवा होता.
सतीश शहा नि पेस्तोन काका हे गुजराती शेठ सारखे रंगवले आहेत.. त्यांना एक ब्रिटीश वळण हवे होते.. शिवाय ते जरा बारीक हवे होते. ( मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या सारखं )
हरितात्या तर एकदम काहीच्या काहीच वाटले ... टोटल फेल 
दिलीप प्रभावळकर सारखा  जेष्ठ  कलाकार हि  अंतू बरवा सारखी व्यक्ती रेखा रंगवताना कमी पडला असे जाणवते .. त्याचे बोलणे  मुंबई च्या "कोकणी" चाकरमान्यान सारखं   वाटतं .. खरा अंतू बरवा  हा "कोकणस्थी " थाटाने बोलतो ... 
मोहन आगाशे म्हातारा म्हणून ठीक आहे पण "चितळे मास्तर " म्हणून बरा वाटला नाही. चितळे मास्तरांचा सोज्वळ पण ह्या माणसाच्या चेहर्या वर दिसत नाही.
राव साहेब हे व्यक्ती चित्र काही जमले नाही असं मला वाटलं...केवळ चांगल्या डायलॉग मुळे ते निभावून गेले आहे.. गदिमा मात्र छान वाटले !
नारायणा चे काम चांगले झाले आहे .. बबडू हि मस्त झाला आहे. नामू परीट हि दाद घेवून जातो !
प्रसाद ओक , पुष्कर श्रोत्री  हि छोटेसे रोल छान करून जातात.  
पण सिनेमात सुसूत्रता जाणवली नाही... एखादी डॉक्यूमेंटरी म्हणावी एवढी हि सुसूत्रता ह्या दिग्दर्शकाला साधता आली नाही.

पार्श्व  संगीत हे फार वाईट  होते आणि भडक  होते ... तांत्रिक दृष्ट्या हे संगीत काही डायलॉग खाऊन टाकत होते. एकंदरीत संगीत हे लो बजेट आणि हौशी लोकांनी केले असावे असे वाटते. 

पुल प्रेमींच्या एकंदर अपेक्षा खूप असणे  साहजिक होते,  त्या अपेक्षा भंग होणे हे हि समजू शकतो ...पण हा  सिनेमा अपेक्षा भंग होण्या च्या पायरीवर हि पोहोचू शकला नाही असे मला वाटले.





Wednesday, February 8, 2012

खुशीची फकिरी



हि खुशीची फकिरी फार अजब असते ..हि न उतरणारीच भुतं ...

कोणाच्या जीवनाला चौकट मानवते .. कुणाचे जीवन रांगोळीच्या कणा सारखे विसकटण्यातच रमतं ...
रांगोळी चा  प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेवून पडतो. तशी हि माणस जिथे जातील तिथे आपला रंग टाकतात.
घरच्या चौकटीत, शिस्तशीर समाजाच्या चौकटीत त्या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना .. मग आपल्याशी जमणारा रंग शोधीत हिंडतात ... ह्या माणसांची कुळ निराळी  कुळाचार निराळे !
आवश्यक गरजा सुटत नाहीत ... कितीही चुकवायच्या म्हणल्या तरी जीवनाच्या चौकटी चुकत नाहीत ... म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते ! 

सभ्य संस्कृती समाजातल्या स्थानाची शिष्ठाचारांची कसलीही कुंपण त्यांना आड येत  नाहीत ..
मनाची कवाडं सताड उघडी टाकून हिंडणारी हि माणसं .. पहाणार्यांनी काय पहायचे ते सरळ पहावं डोकावून ..
भल्यांना लंगोटी आणि  नाठाळा ला काठी ! हाच अगदी साधा सूत्र मंत्र !
....
....

काही काही हस्तस्पर्शच असे असतात कि त्यांच्या हातात कण्हेर हि गुलाबा सारखी वाटते !

रावसाहेब ( पु ल ) मधून 

Monday, February 6, 2012

गोळा बेरीज



पुलं च्या साहित्या वर आधारित  " गोळा बेरीज " हा मराठी चित्रपट १० फेब ला येतो आहे .. आणि तो पहाण्या साठी मी अतिशय आतुर आहे... फर्स्ट डे फर्स्ट शो पहायला मिळाला तर उत्तम ..
ह्या सिनेमा बद्दल मिळालेल्या माहिती नुसार काही खटकलेल्या गोष्टी .. अजून सिनेमा बघितला नाहीये पण खालील व्यक्ती रेखा आणि त्या साकारणारे काही कलाकार आश्चर्य कारक वाटतात .


नंदा प्रधान : सुबोध भावे ... ( मला नेहमी सचिन खेडेकर हा नंदा प्रधाना सारखा वाटत आला आहे ) सुबोध भावे ला हा रोल का दिला हे माहित नाही ... सचिन खेडेकर  हाच खरा नंदा प्रधान !

हरी तात्या :    ( मला दामू अण्णा मालवणकर यांच्या सारखे हरितात्या वाटतात ) .... रोल कोणी केला आहे ते माहित नाही ... पण हरी तात्यांचे काऊस्टूम  जरा अधिक आणि  मौडर्न  वाटतात !    

पेस्तोंजी : सतीश शहा ( मला पेस्तोंजी हे बारीक आहेत असे वाटते .. सतीश शहा फार जाड आहे ह्या रोल साठी  पेस्तोन काका हे बारीक होते .. त्यांची बायडी हि त्यांच्या पेक्षा उंच होती ... त्याना एक ब्रिटीश वळण होते ) सतीश शहा हा नुसता गुजराती शेठ वाटतो ... पेस्तोन काका असे नाहीत !

रावसाहेब : कोणी केला आहे माहित नाही .. पण राव साहेब ग दि मां सारखे डोळ्या समोर उभे आहेत .. तांबूस गोरा वर्ण , उंचपुरे, कन्नडी वळणाचे धारदार बोलणे आणि वागणे !

अंतू बरवा ( माझं आवडतं व्यक्ती चित्र  ) :  दिलीप प्रभावळकर ठीक आहे पण    ... प्रसाद सावरकर हेच फक्त अंतू बरवा करू शकतात   असं माझं मत आहे

चितळे मास्तर : मोहन आगाशे  ...  मोहन आगाशे सारख्या क्रूर दिसणार्या माणसाला चितळे मास्तर बनवणे हि सर्वात मोठी चूक आहे असे मला वाटते ... बघू हा नाना फडणवीस काय करतोय ते !

गटणे :  दुष्यंत वाघ नावाच्या एका मुलाला हा रोल मिळाला आहे जो खूप आधुनिक  वाटतो आणि आमच्या गटण्या सारखा बिलकुल भासत नाही  ...  माझ्या डोळ्या समोरचा गटणे हा बुटका, गहूवर्णी , गोल चेहर्याचा  आहे ..

बबडू , गजा खोत , भय्या नागपूरकर  कोण करत आहेत माहित नाही पण त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे

पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांची कामे पाहण्यास उत्सुक आहे.



Thursday, February 2, 2012

निवडक रावसाहेब



एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.

आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

 बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 
हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !
    
काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..
रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?




निवडक हरितात्या



हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...
वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास  सनांच्या  गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...
हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !
प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते ?  हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही

माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..
पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...
एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पडलेल  पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..
या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा.

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..
चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला...... 




Wednesday, February 1, 2012

निवडक अंतू बरवा


रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात.  देवानी ...माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे , नारळा फणसाचे , खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.
जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..

विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !

कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील ....खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !