Thursday, November 8, 2012

ब्लॉग चा पहिला वाढ-दिवस !







आज ८ नावेम्बर ... पु लं चा वाढदिवस ... आणि ह्या  ब्लॉग चा हि  पहिला वाढ-दिवस !

म्हणून ब्लॉग ची पहिली पोस्ट परत एकदा पोस्ट करतो


आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...
पुण्या चा जाज्वल्य अभिमान असणारे ही आता चारलोकात बिचकून वागतात ... हमारे वक्त पूने में ऐसा नहीं था ..वैगरे वाक्य आपल्या मित्रात टाकुन बघतात ... पण त्या पुढे काही मजाल जात नाही
त्याला कारण ही तसेच आहे... ठेवलय काय आता इथे ... मुंग्यां सारखे लोक बे एरिया मधे गेले... तिकडे सदाशिव , नारायण , शनिवार पेठा वसव्ल्या.. बरोबरंच आहे .. पुढची पीढ़ी तरी सुखात नांदेल ... लोणी साखरेची चव पीनट बटर मधे शोधावी लागतेय एवढच दुख्ख

म्हणतात की आय टी नी पुण्याची प्रगति झाली .... कसली डोम्ब्ल्याची प्रगति ? नुसती गर्दी वाढली ... ती ही बाहेरची... पुण्यात आता मराठी बोलणारा हुड्कावा लागतो ... आपला असा एक म्हणाल तर शपथ ... परकेच जास्त ..
आय टी ने फ़क्त एकच केले ... पुण्याला पौडाच्या जवळ न्हेले !!!!

- अंतु बर्व्याचे स्वगत ( ८ नोव्ह २०११ )


Saturday, August 11, 2012

अल-विदा


हा ब्लॉग सुरु करण्याचं कारण होतं .. देवनागरीत / मराठीत  काहीतरी लिहावं आणि आपल्या लोकांशी मैत्रीची नाळ जुळावी ... ती साध्य झाली असं वाटतय ... फक्त ह्या ब्लॉग मुळेच  अनेक मित्र मिळाले ..भेटले ...मनाच्या गाठी जुळल्या...  ब्लॉग अपडेट का केला नाही म्हणून अनेक लोकांनी इ -मेल केले , फोन केले ह्यात त्यांच्या प्रेमाची पोच मिळाली ... शतशः धन्यवाद !
गुगल एनालीटीक्स प्रमाणे  गेल्या ६ महिन्यात ३८९९३ "विजिटर्स" आले आणि हि ट्राफिक  " मराठी ब्लॉग विश्व  डॉट नेट " व  " गुगल "  नी  "पाठवली "  .. असो   .. त्या सर्वांचे आभार !
८ नोव्हेंबर  (पु लं  जयंती )  ते   १२ जून ( पु लं पुण्यतिथी )  .. रोज काहीतरी लिहिण्याचा नेम केला होता ...रोज काही जमलं नाही ..पण जमलं तसं लिहिलं .. पहिल्या दिवशी च्या मानाने आज देवनागरी बरी जमते आहे ! :)

मनातलं काहीतरी  ...

अनेक बरे वाईट अनुभव आले ... बरे जास्त ... वाईट थोडेच ! :)    १२-१५ वर्षात पुणे किती बदललय हे जाणवलं ! जसे भामटे भेटले तसेच  जीव ओवाळून टाकावी अशी माणसं हि भेटली ! :)

मी पुण्यात वाढलो असलो तरी मराठी शाळेत कधी गेलो नाही ..  माझी शाळा  : केंद्रीय विद्यालय   .. त्यामुळे लहानपणी पासूनच  हिंदी आणि इंग्रजी शी एकदम गट्टी जमली ...  एक प्रकारे ते चांगलंच झालं .. देशभरातील अनेक मित्र झाले .. पुढे विदेशात हि जुळवून घेयला त्रास झाला नाही !
मी स्वतः  आयुष्यात मराठी कधीही शिकलो नाही .. अगदी " ग म भ न " सुद्धा नाही .. " गमभन " शिकलो ते एकदम कॉम्पुटर वर देवनागरी लिहिण्या साठी .... :)
माझं  " मराठी पण " हे  माझ्या  "सदाशिव- नारायण -शनिवार " पेठे तील लहानपणातच मला गवसले.   "भावे हायस्कूल - नुमवि - रमणबागे "  मध्ये जाणारे मित्र आणि  "हुजूरपागा - अहिल्यादेवी " मध्ये जाणाऱ्या मैत्रिणीं  .. ह्यांनीच मला मराठीपण दिलं. 

माझं " मराठी " शिक्षण झालं  ते  केवळ घरातल्या बोली भाषेचं आणि पुढे .. पुलं-वपु-गदिमा  ह्यांच्या लेखणीतून ! सर्वात मोठा हातभार लावला तो म्हणजे   "स . प  महाविद्यालया " नी . अकरावी पर्यंत " देढ-गुजरी " असलेला मी .. बारावी संपेस्तोवर  "परशुरामीय" मध्ये दोन लेख प्रकाशित करू शकलो ! पुढे  बी . जे  वैद्यकीय  महाविद्यालया नी हि मराठी पण जोपासले ते  "बैजेमिक " च्या मराठी विभागाने आणि  " आर्ट-सर्कल " नी ! :)
अनेक वर्षे पुण्याच्या बाहेर राहिल्या नंतर ...पुण्यात येऊन " जुळवून " घेण्यात ह्या ब्लॉग लिखाणा नी खूप मदत केली ! योगायोग असा कि ... आज ११ ऑगस्ट ... ११ ऑगस्ट ९५ ला मी पुणे सोडून मुंबई ला के इ एम हॉस्पिटल ला गेलो होतो ... आणि पुढे ह्याच ऑगस्ट च्या १४ तारखेला  १९९८ मध्ये भारताला अलविदा केला होता !  :)
आज मी ह्या ब्लॉग ला अलविदा करत आहे ..जोडलेले अनेक मित्र - मैत्रिणी जवळ आहेत ..ते रहातीलच ! :)
भेटू असेच परत ..कधीतरी !

अल - विदा !













Saturday, June 2, 2012

इंटरनेट ऍडीक्शन (Addiction) डीसऑरडर

इंटरनेट ऍडीक्शन  (Addiction) डीसऑरडर ने आपल्या पैकी बऱ्याच जणांना ग्रासलंय , इंटरनेट चं व्यसन लागलं आहे . बर्याच जणांना आपण इंटरनेट च्या आहारी गेलो आहोत हे लक्षात आलेलं नाही. अनेक युवक आणी युवती दिवसातील अनेक तास आपल्या स्मार्ट फोन मध्ये डोकं खुपसून  "खर्या " जगा पासून आपला संबंध जवळ जवळ तोडून असतात .. त्यामुळे आयुष्या वर अनेक नाकारात्मक परिणाम होतात ..
इंफोरमेशन ओव्हरलोड मुळे सतत कुठल्या नं कुठल्या वेबसाईट - डेटाबेस चा शोध घेण्याच्या सवयी मुळे काम करण्याची क्षमता , कुटुंब  आणि मित्रांसोबत संवाद कमी होतो..
ह्याचे प्रकार म्हणजे .. सायबर रिलेशनशिप  ऍडीक्शन  ( ट्विटर , फेसबुक ) , नेट कम्पल्शन , सायबर सेक्स   ऍडीक्शन  ई...

आजाराची लक्षणे :
१) वेळेचा भान न रहाणे
२) इंटरनेट चा वापर करायला मिळावा म्हणून ऑफिस मध्ये मुद्दामहून उशिरा काम करत राहणे.
३)घरचे  किंवा मित्र -मैत्रिणींशी संपर्क कमी होणे / तुटणे
४) कोणीच आपल्याला समजून घेत नाही असं सतत वाटणे
५) अति ताणां मुळे मुक्तता मिळावी म्हणून इंटरनेट चा वापर करणे
६) इंटरनेट सुरु केल्या क्षणी उत्साह वाटू लागणे

शारीरिक लक्षणे :
१) हात व मनगटातील बळ गेल्या सारखं वाटू लागणे
२) डोळे कोरडे होणे , डोळ्या वर ताण येणे
३) सतत झोपमोड होणे
४) पाठ मान , डोके दुखणे
५) अचानक वजन वाढणे / कमी होणे

उपाय :
१) सदा सर्वकाळ ऑनलाईन नसलेल्या मित्रांशी संपर्क ठेवा
२) बाहेर फिरायला जा . पुस्तकं , संगीत , नाटक -कविता अभिवाचन अशा गोष्टींसाठी वेळ काढा
३) एकटे असताना इंटरनेट व्यतिरिक्त इतर कामे करा
४) इंटरनेट साठी मोजून दिवसातला ठराविक वेळ द्या .. तो वेळ हळू हळू कमी करा !


काही माहिती महाराष्ट्र टाईम्स -पुणे टाईम्स च्या ३१ मे च्या अंकातून साभार !

Sunday, May 13, 2012

अनुबंध


कुठल्याही स्वतंत्र वृत्तीच्या कलावंताला आपण कुणाच्याही छाये खाली असावं किंवा कुणाकडून तरी उसन्या आणलेल्या कमाई वर आपण जगावं हि कल्पनाही नको असते. कलेच्या अवकाशात आपलं भला किंवा बुरा पण स्वतः चं असं स्वयंभूपण सर्वमान्य व्हावं हि त्याची सहज धारणा असते.
पण तो सुज्ञ असेल तर त्याला हे हि ठाऊक असतं कि ह्या आकाशा खाली संपूर्ण नवा असं काही जन्मत नाही. अनेक व्यक्ती , घटना , कलाकृती ह्यातून कळत - नकळत प्रेरणा  घेऊनच आपली वाटचाल सुरु होते आणि सुरु राहतेही . मात्र त्या पुर्वपरंपरांच्या  प्रेरणांमध्ये स्वतः च्या आयुष्याच्या रक्ता मासांमधून आणि त्यांनी दिलेल्या सर्वस्वी स्वतः च्या जाणिवांतून जन्मणारं जन्मणारा असं काहीतरी "स्व" मिसळावा लागता आणि त्यातून मग आपलं एक वेगळेपण सिद्ध हॉट राहतं...
इतकच नाही तर आपल्या आत जन्मलेल्या  जाणिवा ह्या हि केवळ आपल्याच असतात असं नाही ..
जुन्या काळाच्या कुठल्या तरी वळणावर त्याचं जाणिवा पुन: पुन्हा होणार असतात ...
काल आज नि उद्याही ...
त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या अनुबधातून आपल्याला सातत्याने काही ना काही मिळत असतं. आपल्याकडून हि उद्या ते  कुणाला तरी मिळणार असतं...

एका कलासक्त , मर्मग्राही , सर्जनशील मनाने  आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या अनुबंधान्चा घेतलेला एक रसज्ञ  वेध !

"अनुबंध"   कवी सुधीर मोघे 

Thursday, May 3, 2012

(अधिक)खाण्या विषयी थोडं

गाण्या प्रमाणे खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे . रागांना वर्ज्य बिर्ज्य स्वर असतात , तसे खाण्याला सुद्धा असतात. उदाहरणार्थ , श्रीखंड घ्या. बाकी , जोपर्यंत  मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तो पर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातय  म्हणा ! तर श्रीखंड . आता बागेश्री रागाला जसा पंचम वर्ज्य असतो तसंच पानात श्रीखंड असताना वर्ज्य काय याचा विचार केला पाहिजे. कितीही जबरदस्त खाणारा असला तरी त्याला ए "श्रीखंड पावाला लावून खा ," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरी सारखा गाव्हाचाच केलेला असतो ; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे . पाव आणि अंड्याचं आम्लेट हि जोडी शास्त्रोक्त आहे . पुरी आणी  आम्लेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत . जिलबी आणी  मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणी .... छे ! जिलबी ला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही . खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात , तसंच पदार्थांची कुठली गोत्र जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात . रागा प्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो . सकाळी थालीपीठ हि  बेचव वाटतं. मारवा राग जसा संधीकालातला , तसाच थालीपीठ देखील साधारणतः भीमपलास आणि पुरिया धनाश्री  या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं . सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणी संध्याकाळी साडेपाच - सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा!
बाहेर पाउस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत , तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दोन भजी खाल्ली तरी ती अधिक. पण बाहेर पाउस पडतो आहे , हवेत गारवा आहे , अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत . अधिकचं  हे असं आहे . लोकं भलत्या वेळी , भलत्या ठिकाणी आणी भलतं खातात . हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्यांचं पोट नव्हे , मुख्यतः डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणाऱ्यांची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणी चहावर धूम्र पान केलं पाहिजे. खाणयापिण्याचं ही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्र प्रगत होतंच पण शस्त्रवेत्ते हि होते. उपासाचं खाणं  देखील शोधून काढणारी ती  विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणार्या माणसान  इतकिच  उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत .
सारी भारतीय संस्कृती खाण्या भोवती गुंतली आहे; नव्हे टिकली आहे . होळीतून पोळी काढली कि उरतो फक्त शंखध्वनी . दिवाळी तून फराळ वगळा, नुसती  ओवाळणीची वसुली उरते. संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ  लावलेली बाजरीची भाकरी , वांग्याचं भरीत  आणि तिळगुळ आहे तो वर ' गोड गोड बोला', म्हणतील  लोकं . कोजागिरी पौर्णिमे तून आटीव केशरी दुध वगळा, उरले फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी स्वस्तात  मिळालेल्या उमेदवार गवयाचे गाणं. गणेश चतुर्थीला मोदक  नसले तर आरत्या कुठल्या भरवश्यावर  म्हणायच्या ? रामनवमीच्या सुंठवडा , कृष्णाष्टमीच्या दहि लाह्या , द्त्तापुढले पेढे , मारुतराया पुढलं साधं खोबरं अन खडीसाखर ... सारया  देवांची मदार या खाण्यावर आहे . समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन  भरपूर पचवणारं  राष्ट्र हि आहे. माणसं  एकदा खाण्यात गुंतली कि काही नाही तरी निदान वादुक बडबड तरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय ? आणि केव्हा ?  

(पुलं च्या रेडिओ वरील एका भाषणातून ) 

Wednesday, May 2, 2012

आनंद - अज्ञान


पोहता न येणार्या मुलांना पाण्याची भीती वाटते ; पण एकदा पाण्याशी मैत्री केली , ते पाणी आपण त्याच्यावर कसं हातपाय मारले असताना हवा तितका वेळ उचलून धरतं हे कळलं , कि सुट्टी लागल्या बरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो कि नाही ? सुरुवातीला जातं थोडं नाका तोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बारा सांगतोय ते कळतच नाही . अशां वेळी नाका तोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलत , तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर  मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही , तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.
मी कशाचा आनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ?  थोडासा जड वाटला ना शब्दप्रयोग ? तसा तो जड नाही. ' ' ज्ञान ' म्हणजे काही तरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करून दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे , " अरेच्च्या ! आपल्याला कळलं !"  असं वाटून होणारा आनंद ! मग तो एखाद्या यापूर्वी कधी नं कळलेल्या शब्दाचा असेल , न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.
विद्यार्थी म्हणजे तरी काय ? विद् म्हणजे जाणणे , कळणे ; अर्थी म्हणजे इच्छा असलेला . ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी . अज्ञान असणं यात काहीहि चूक नाही ; पण  अज्ञान लपावण्या सारखी  चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही .

(पुलं नी रेडियो वरून विद्यार्थ्यांना दिलेल्या एका भाषणा तून ) 

Tuesday, May 1, 2012

खादाड


मला  माझ्या देशातल्या पर्वत-नद्यां इतकाच खाद्य पदार्थांचा अभिमान आहे ! ज्याने  आयुष्यात मद्रास इडली खाल्ली नाही , ज्याने कधी मराठी पुरणपोळी चाखली नाही , ज्याला माहिमी हलवा माहीत नाही , मुंबईची भेल ज्याच्या पोटात गेली नाही , देवास- उज्जैन कडली रसभरी ज्यानं खाल्ली नाही , आग्र्याच पेठा म्हणजे काय आणि मथुरेची रबडी कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही , दिल्लीचा सोहन हलवा आणि कलकत्याचा रसगुल्ला , भावनगरी फरसाण ह्या मंडळींना जो ओळखत नाही त्यानं भारतीय संस्कृती बद्दल उगीच बोलू नये. जगाचा सत्यानाश या 'बद्धकोष्ठ ' झालेल्या लोकांनी केला आहे . भरपूर खाऊन मस्त ढेकर देणारा मनुष्य कधीही जगाचं वाईट करणार नाही . एक तर कुणाचं वाईट करायला लागणारी धडपड त्याला झेपणार नाही ; कारण पोटभर खाणं झाल्या वर लगेच घोरायला लागण्यात जी मजा आहे , त्याची तुलना कशाशीच कोणार नाही . पोटात ब्रम्ह गेल्यावर होणारां तो ब्रम्हानंद आहे आणि ब्रम्हानंदाची का कशाशी तुलना होते ?
ह्या ब्राम्हानन्दाच्या प्राप्तीसाठी खातो , भरपूर खातो . माझे मित्र म्हणतात, कि तु खाऊन खाऊन मरणार एखाद दिवशी . मी म्हणतो  , न खाऊन  मारण्यापेक्षा खाऊन मेलेलं काय वाईट ? आता अजिबात कधीच मरणार नाही असं जर कुणी सांगू लागला , कि तू खाऊ नकोस , अमर होशील , तर एक वेळ- पण नाहीच ! न खाता अमर राहण्यात तरी काय मौज आहे ? त्यापेक्षा खाऊन मेलेलंच बरं ! अन्नाचा अनादर करून जिवंत राहण्यापेक्षा  त्याचा आदर करत करत मृत्यूच्या  मुखात पडणं , ह्यात मृत्युला देखील जो काही आनंद होईल त्याची कल्पना माझ्या सारख्या खादाडालाच येईल. कारण मृत्यू हा म्हणजे अगदी खादाडां चाच  बादशहा. त्यानं आजवर खाल्लंय त्या मानान आम्ही काय खाल्लंय ?

(पुलं च्या एका रेडियो वरील भाषणातून )

Monday, April 30, 2012

कट्टा संस्कृती-तरुणाई


'युवा पीढी ' अशी घाऊक कल्पना मनात बाळगून तिच्यावर बरेवाईट शेरे मारणं मला योग्य वाटत नाही . तारुण्य हा समान घटक धरला तरी प्रत्येक तरुण एकाच साच्यातला गणपती नव्हे. तरीही मनाचा मोकळेपणा , साहसाची हौस , तरुण तरुणींना परस्परांविषयी वाटणारं आकर्षण , फार शिस्त लावू पाहणार्या मंडळी विषयी थोडीफार भीती , थोडाफार तिटकारा हि प्रतिक्रिया सनातन आहे. कॉलेजात असताना पुण्यातल्या "गुडलक" मध्ये  आमचा अड्डा जमत असे.  आताची पीढी "वैशाली" त जमते . प्राध्यापकां पासून ते बोल घेवड्या देशभक्तां पर्यंत  आणि लेखाकांपासून ते एखाद्या शामळू सिनेमा नटा पर्यंत सर्वांची टिंगल टवाळी चालायची , नकळत व्ह्यायची , चांगल्या  आणि फालतू विनोदांची , पाचकळ शाब्दिक कोट्यांची फैर झडायची. त्यामुळे कट्टासंकृती पाहिली कि एक सुदृढ परंपरा आजतागायत चालू असल्याचा मला आनंद वाटतो. तत्कालीन पेंशनरांना उनाड वाटणार्या त्यातल्या कित्यक तरुणांनी बेचाळीस च्या चळवळीत  स्वतः ला झोकून दिलं होतं . ..तुरुंगवास सहन केले होते आणि तुरुंगात हि देशाचं  कसं होईल ह्याची चिंता करत न  बसता तिथंही कट्टा जमवला होता .
आजहि मला तरुण तरुणींची कट्टा -थट्टा रंगत आलेला  दिसला  , कि ती मंडळी माझ्या आप्तस्वकीयांसारखीच  वाटतात. आपण उच्चस्थानावर उभं राहून त्यांच्या त्या वागण्याची तपासणी करत रहावं असं न वाटता त्या कट्टे बाजान च्या  मैफिलीत हळूच जाऊन बसावं असंच  वाटतं. त्यामुळे त्यांचं ते मोकळेपणानं वागणं मला कधी खटकत नाही . पोशाखाच्या तर्हांची मला मजा वाटते. रस्त्यावरच्या भयंकर गर्दीत आपली स्कुटर चतुराईनं घुसवणार्या मुलीचं मला कौतुक वाटतं. मात्र अकारण उद्धटपणानं किंवा दुसऱ्या कुणाला ताप होईल असं वागणं हे मात्र मला खटकतं.
पुन्हा तरुण व्हायला मिळालं तर खूप आवडेल . डोंगरदर्यांतून मनसोक्त गीरीभ्रमणं करीन , मैदानी खेळात भाग घेईन. भरपूर पोहीन , चित्र काढीन. अशा अनेक गोष्टी  राहून गेल्या आहेत. त्या पूर्ण करायला मनाला शरीराची साथ मिळायला हवी . त्याबरोबरच त्या नवीन तरुण मनाला साजेल अशा जिद्दही नं  सामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प हाती घेवून तो पुरा करण्या मागं लागेन.

(पुलं , कॉलेज कट्टा , दिवाळी १९९६ )

Sunday, April 29, 2012

जे आनंद देईल ते आपलं !

जीवनात  काही भव्य दिव्य दिसलं तर त्यानं भारून जायचं, त्याचंच कौतुक करायचं आणि तुलनेनं जीवनातील वाईट आहे त्याकडे तितकसं  लक्ष द्यायचं  नाही , असा हा माझ्या स्वभावाचाच भाग आहे. म्हणजे मल्लिकार्जुन मन्सूर किंवा कुमार गांधारांचं गाणं ऐकून कि भारून जातो . या दोघान इतकच जर एखादी लहान मुलगी चांगली गायली तरीही मी भारून जाईन आणि या दोन्ही भारून जाण्यात गुणात्मक फरक काहीच नसतो . मला एकदम ते अपील होतं . मला अजूनही  हे समजलं नाही कि मला आमुक आवडलं नाही , हे सांगण्यासाठी पन्नास पानं का खर्च करावी ? मला जे आवडलेलं  आहे ते दुसर्याला सांगायचा मोह होतो . मला आवडलेल्या पुस्तकान बाबत मी जे काही लिहिलंय ते समीक्षेच्या स्वरुपाच नसून त्या लेखनाला दिलेली दाद अशा स्वरूपाचं आहे. समीक्षा करायची म्हटली कि काही म्हटलं तरी , त्यातले दोष दाखवण्याची जवाबदारी येते . त्याशिवाय समतोल साधला जात नाही असं समजलं जातं . मला आवडलं ते मी सांगणार. पुष्कळ लोकं म्हणतात, तुम्ही 'गुण गाईन आवडी ' चं करता . सद्गुण  तेवढे दाखवता. दुर्गुणांचं  काय ? आता दुर्गुणांच जे व्हायचय  ते होईल . दुर्गुण आणि तो मनुष्य ते बघून घेतील . मला त्याच्यात रस नाही.
माझ्या स्वभावात चिकित्सा  हा भाग नाही. स्वीकार हा भाग जास्त आहे. मला जे आनंद देईल ते आपलं वाटतं.

( पुलं च्या एका मुलाखातीतून ... )

Wednesday, April 25, 2012

गदिमा


एकनाथां प्रमाणे  माडगूळकर हा सर्व पेठांचा कवी . भागवता पासून भारुडा पर्यंत नानापरीन्च्या गीतांचा तो एक जसा जनक होता तसेच  माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी छुमछुमत असते.
देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो. एखादी नात आजीला गीत-रामायण एकवत असते. एखाद्या विजानात तरुतळी एक वहि कवितेची घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी युवती माडगूळकरांचे गीत गात असते; आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समर गीतांच्या धुंदीत पावले टाकत असतात. कवीच्या हयातीतच त्या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभले. माडगूळकरानच्या कढत लावणीचा चटका बसलेले एक गृहस्थ चिडून मला म्हणाले होते , कि " माडगूळकरांनी असल्या फक्त लावण्याच लिहाव्यात ! मी सांगतो , 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम ' सारखी एक ओळ माडगूळकरांना लिहिता येणार नाही . असल्या तेजस्वी कवी कडे जाऊन शिका म्हणावं ! "
"ते शक्य नाही , " मी म्हणालो
"का ?"
"कारण 'वेदमंत्राहून आम्हा ' हे गीत सुद्धा ग.दि माडगूळकरांचं च आहे ."

संत-शाहीरां नंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पहाण्यात नाही . सामान्य आणि असामान्य, दोन्ही प्रतींच्या रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कवी आहे.
कवी म्हणजे माडगूळकर हेच  समीकरण आहे. त्यांचे गीत-रामायण ऐकणाऱ्या श्रोत्यांना तर ह्या कवीला आणि गायक सुधीर फडक्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले आहे . त्यांना प्रतिसाद मिळतो तो 'पुंडलिका वरदा ' म्हटल्यावर हजारोंच्या मुखांतून ' हाऽऽरि विठ्ठऽऽल ' उमटतो तसा ! आईने दुधा बरोबर ओवी पाजून वाढवलेला हा कवी आहे . आता उमलतात ती त्या शुध्द देशी संस्काराची फुले.

( पुलं नी गदिमांच्या  गीतसौभद्र ह्या  गीतकाव्य - संग्रहाला(१९६८) लिहिलेल्या प्रस्तावनेतून साभार )

Saturday, April 21, 2012

उन्हाळ्यातली पेय भ्रमंती

ह्या आधीची खाद्य भ्रमंती .. इथे  इथे  इथे आणि इथे  पहा

उन्हाळ्यात सर्वांची आवडती "सखी " म्हणजे  "मस्तानी" ... हिचं  नाव लहान मोठ्यांच्या मनात येतं  ते तिच्या गोडव्या मुळे ... घट्ट मिल्क शेक वर तरंगणारया आईस्क्रीम गोळ्या च्या थंडाव्या  मुळे आणि त्या नंतर पोटात मिळणार्या शांतते मुळे ! प्रत्येक गावात आईस्क्रीम / मस्तानी खाण्या साठी एक विशेष ठिकाण नक्की आहे .. असतं... भारतात कुठे हि जा... अगदी विदर्भातल्या रण-रणत्या गावापासून ते खालच्या कोकणातल्या एखाद्या लहानशा बाजारा च्या ठिकाणा पर्यंत ..
पुण्याचं  हि असंच "मस्तानी" शी नातं आहे.
खरं तर पुण्यात पहिली "मस्तानी" सुरु केली ती खजिना विहिरी जवळच्या- स्काउट ग्राउंड समोरील  बुवा आईस्क्रीम  वाल्यांनी ...तेव्हाची मस्तानी हि खर्या दुधात पिस्ता, चोकोलेट , अंबा किंवा गुलकंद सेंट घातलेलं दुध  .. त्या वर .. पॉट मध्ये तयार केलेल्या मलईदार आईस्क्रीम चा गोळा ...एका मोठ्या ग्लास मध्ये मोठा उंच चमचा घालून मिळत असे .. ( पुढे  काही लोकं ह्या चमच्याला "अमिताभ" म्हणत )
पुढे कावरे कोल्ड्रिंक्स  (गणपती चौक आणि तुळशीबाग ) आणि इतर आईस्क्रीम वाल्यांनी हि मस्तानी विकायला सुरवात केली ... लहानपणी मी पेयलेल्या  मस्तानी तील  मिल्कशेक (आताच्या मनाने ) पातळ असायचा ... तो पिता येयचा. आजकाल तो बराच "पिठूळ लेला " , घट्ट असतो ..पिता येत नाही .. खावा लागतो ! ( बहुतेक पावडर च्या दुधा मुळे असेल )
आताचे आघाडीचे 'मस्तानी वाले " म्हणजे  कोन्ढाळकर (ओरीजिनल घट्ट मस्तानी बनवणारे) , सुजाता मस्तानी ( हे पण कोन्ढाळकरान पैकीच ) ... सुजाता मस्तानी च्या आता पुण्यात अनेक ठिकाणी शाखा सुरु झाल्या आहेत . ह्यांची सुरवातिची दुकानं निंबाळकर तालीम चौकात अजून हि चालू आहेत.
अमृत कोकम हे अनेक ठिकाणी प्यायला मिळते ..पण "गणू शिंदे" यांचे स्पेशल अमृत कोकम हे एक विशेष चवदार पेय आहे.... पूर्वी स्पेशल अमृत कोकम मध्ये लिम्का असायचा आता त्या ऐवेजी लेमन किंवा लेमोनेड घालतात ...लक्ष्मी रोड वरील ट्राफिक सहन करत गणू शिंदे कोल्ड्रिंक हाउस मध्ये केवळ "स्पेशल अमृत कोकम " पिण्या साठी जावं ! तिथे गेलात तर " थंडाई " चा एखादा ग्लास हि घेयला विसरू नका !
उन्हाळयात  मला अत्यंत आवडणार्या गोष्टी मध्ये "बर्फाचा  रंग बिरंगी गोळा" हे आहे .. तसं  "गोळावाले" आजकाल कमीच दिसतात .. पण तो गोळा बनवताना .. बर्फाच्या लादीतून बर्फाचा किस काढताना ... तो लहान मोठ्या ग्लासातून घट्ट बसवताना .. काडी रोवताना .. त्यावर रंग ओतताना  बघण्यात एक अजब मजा आहे... हैदराबाद हे शहर मला आजिबात आवडलं नाहिये पण  तिथे पानांच्या दुकानात मिळणारे "आईस गोळे " हि एकमेव आवडलेली गोष्ट !
उन्हाळयातील बाकी पेयान मध्ये .. कलिंगडाचा रस - वर छोटे काप , कैरीचे गुळातले थंडगार पन्हं ,  करवंदाचे सरबत , वाळा सरबत, उसाचा थंडगार रस, थंडगार नीरा ...    हे नुसते आठवले तरी सुद्धा मनाला एक प्रकारची उल्हासित करणारी शीतलता मिळते ह्यात  काही नवल नाही !

सकाळी नीरा ....दुपारी लिंबू सरबत , कलिंगड रस -काप  , वाळा सरबत .. अमृत कोकम  ... संध्याकाळी चटकदार भेळ - पाणीपुरी ..भेळ तिखट लागल्या मुळे एकदोन ग्लास उसाचा रस ... रात्री अंबा-पिस्ता मस्तानी ... अजून काय हवं उन्हाळा आवडायला ?

Wednesday, April 18, 2012

मध्यमवर्गीय लेखक


मी माझ्या आयुष्यात  मला ज्या अनुभवांविषयी लिहावंसं वाटलं त्यांच्यावर लिहिलं. मी कारकुनी पेशा असलेल्या वातावरणात जन्माला आलो आणि वाढलो.  त्यासंबंधी मी लिहिलं. ह्यात मी काही गुन्हा वैगरे केला असं मला वाटत नाही. उलट , टूम म्हणून मला ज्ञात नसलेल्या कामगार जीवनावर लिहिण्याचा आव आणून आपण पुरोगामी असल्याची शेखी मिरवणं हा गुन्हा ठरला असता.
कारकून वर्ग हा तर माझा थटटे चा विषय. सतत तडजोडी करत जगणारी , टीचभर उंचीच्या महत्वाकांक्षा घेउन जगणारी , 'अब्रू' नामक गोष्टी बद्दल त्यांच्या ज्या काही कल्पना असतात त्यांना जपणारी , सुबकतेला  सौंदर्य मानणारी , असली जी माणसं मी पाहिली तीच माझ्या लेखनातून मी उभी करून त्यांची थटटा केली आहे. हे लोक काही मी समाजा  पुढे आदर्श म्हणून उभे केले नाहीत. त्यांच्याशी माझं वैर हि नाही.
माझा दृष्टीकोन 'मध्यमवर्गीय' आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही मला कुठल्या साचात बसवू इच्छिता ते मला कळत नाही . मी कारकुनी पेशाने जगणाऱ्या कुटुंबात वाढलो. हिंदुधर्मात ज्याला उच्च जाती असं खोट्या अहंकारानं म्हणतात तसल्या जातीत माझा जन्म होऊन शाळकरी वयात त्या जातीचे थोडेफार संस्कार झाले. ती नाती मी केव्हाच तोडली आहेत . देवपूजा , धार्मिक संस्कार , श्राद्ध पक्ष  वैगरे कार्म कांडांशी माझा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात संबंध आला नाही. त्यामुळे बर्या वाईटाला धार्मिक किंवा रूढीने ठरव लेल्या  तराजूने  मी कधीच तोललं नाही. तरी मी तुमच्या दृष्टीने मध्यमवर्गीयच असलो तर मग त्याला माझा इलाज नाही. माझ्या  लेखनात शहरात कारकुनी पेशानं जगणाऱ्या लोकांविषयीचेच उल्लेख अधिक असल्यामुळे मला आपण मध्यमवर्गीय म्हणत असाल , तर ईसाप नीतीला  'पशुवर्गीय ' साहित्य म्हणायला हरकत नाही !

(पु लं नी सुधीर बेडेकर यांच्या प्रश्ना ला दिलेल्या उत्तरातून - पुरचुंडी )

Monday, April 16, 2012

प्रलयातील पिंपळ पाने ...


भयानक विध्वंसात ही नवनिर्माणाची चित्रं ज्यांना पाहता येतात तसंच खरं 'पहाणारे' , तेच द्रष्टे . ते कधी आपल्या गीतांतून , कधी कथांतून , कधी विचारांतून आणि त्याच्याशी सुसंबद्ध असणाऱ्या आचारातून समाजाला जीवनाकडे सौंदर्य लक्षी डोळ्यांनी पाहायला शिकवतात.
प्रलयानंतर हिरव्या पिंपळ पानावर पडून बालकाच्या कुतूहलानं पुन्हा हे जग पाहणारे हेच ते महात्मे . त्यांचे डोळे क्षणापुरते आपल्याला मिळाले तरीही वृक्षवल्लीतलं व्यक्तिमत्व दिसतं आणि लक्ष योजनां पलीकडून चमचमणार्या तारका , "आपल्याशी झिम्मा खेळायला या " म्हणून डोळे मिचकावून खुण्वायला लागतात . ज्ञानेश्वरांनी उगीचच अशा महात्म्यांना 'चेतना चिंतामणीचे  गाव " म्हटलेलं नाही !
वयानं ऐंशीचा पल्ला गाठला तरीही शैशवातलं , ते कुतूहलानं भरलेले डोळे घेवून जगण्यातच रविंद्रनाथांचं मोठेपण होतं . गोचर किंवा अगोचर सृष्ठीतल्या अनुभूतींची त्यांची ओढ अखेर पर्यंत  संपली नव्हती. मग ती अनुभूती कानी पडलेल्या एखाद्या नव्या सुरावली ची  असो , झाडांच्या शेंड्याच्या वार्या- झुळकीबरोबर चालणाऱ्या नर्तनाची असो किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात लागलेल्या एखाद्या नव्या शोधाची असो. ऋतुचक्राच्या लीले पासून ते मानवी जीवनात चालणार्या इतर असंख्य लीलांकडे अशा कुतूहलाने पाहाणार्यांचाच  नित्य नवा दिस जागृतीचा असतो . बाकीच्यांचं आपलं मागील पानावरून पुढे चालू ! त्यांच्या दिवसातला बदल कॅलेंडर वरची तारीख दाखवत असते . हातांना नव्या निर्मितीचा ध्यास नाही , डोळ्यांना नवं पाहण्याची हौस नाही . मनाला नवी मनं जोडण्याचा उत्साह नाही...
पण हे असंच चालायचं म्हणून भागत नाही . विशेषतः , ज्यांना निर्मितीचं देणं आहे , त्यांनी असं म्हणताच कामा नये . त्यांना "आनंदे भरीन तिन्ही लोक " हि प्रतिज्ञा करून जगावं लागतं.

पुलं च्या १९७७ मधील एका लेखा मधून   ( पुरचुंडी ) 

Saturday, April 14, 2012

उन्हाळ्यातील पुस्तक रवंथी


ह्या उन्हाळ्यात वाचलेली ... काही परत वाचलेली पुस्तके !

 कविता संग्रह 

१) मौनाची भाषांतरे : संदीप खरे
पुस्तकाचा गेटअप एखाद्या वहि सारखा .. आवडलं
२) नक्षत्रांचे देणे :  चि त्र्यं  खानोलकर
एव्हर ग्रीन ..
३) पक्षांचे ठसे : सुधीर मोघे
छोटं पण मस्त....
४) विविध कवींच्या १०० निवडक कविता ( निवड कर्ता : कुसुमाग्रज )
संग्रहाय ..
५) शिंग फुंकिले रणी : वसंत बापट
जबरदस्त ....
६) जिप्सी : मंगेश पाडगावकर
सदाबहार ....
७) मीरा : पाडगावकर
८) कबीर : पाडगावकर
९) सुरदास  : पाडगावकर

गद्य 

१) पुरचुंडी : पु ल देशपांडे
२) दाद  : पु ल देशपांडे
३) रेडियो वरील भाषणे आणि श्रुतिका ( भाग १ व २): पु ल देशपांडे
४) व्यक्ती आणि वल्ली : पु ल देशपांडे
५) असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार : अ द मराठे
६) सार्थ भारुडे  : व्यंकटेश कामतकर
७) नादवेध : अच्युत गोडबोले / सुलभा  पिशवीकर
८) अनुबंध : सुधीर मोघे



Friday, April 13, 2012

भोंदुगिरी म्हणावी का वेडेपणा ?



स्वामी आणि महाराज , बाबा लोकांचा सुकाळ चालू आहे.... वेड्या सारखे लोकं यांच्या मागे धावतात ..
कोणाच्या "अंगात " येते आणि ते काही बडबडतात .. त्यातून त्यांचे "भक्त" लोकं काही अर्थ काढून लोकांना सांगतात आणि स्वतः चा खिसा भरून घेतात ... काही शोषण हि करतात ... हे आधुनिक भारतात २१ व्या शतकात चालू आहे ...
गोर -गरीब -अशिक्षित  लोकं हे पूर्वी पासूनच ह्या वेडेपणाला बळी पडत आहेत.. त्यात भर आता "शिक्षित " लोकांची ...कॉम्प्युटर आणि आयटी हि आधुनिकता फक्त नावाला ... भारतीय संस्कृती च्या नावाखाली आयटी वाले लोकच असल्या थेरा पुढे बळी पडताहेत  हे गमतीचे वाटते ...
श्री श्री हा प्रकार पाहिला कि आयटी वाल्या लोकां बद्दल चा सर्व अभिमान गळून पडतो .. श्री श्री हे मुख्यतः आयटी वाले गुरु मानले जातात ... असे अनेक "आयटी" वाले गुरु, दक्षिण भारतात आहेत !
बंगलोर -हैद्राबाद - चेन्नई वैगरे भागात असे अनेक "गुरु -स्वामी - महाराज " आप- आपले आश्रम थाटून बसले आहेत ... आता त्यांच्या "भक्त" लोकांना काय म्हणावं हे कळत नाही .. हे लोकं भक्तान वर काय अशी भुरळ पाडतात हे समजत नाही ... असो . काही वर्षान पूर्वी "नित्यानंद" महाराजाची "कृत्ये" बाहेर आली आहेतच !!
अगदी अमिताभ बच्चन ते सचिन तेंडूलकर असल्या बाबा -स्वामी लोकांना इंडोरस्मेंट करतात   हे आश्चर्य वाटते ! युवराज सिंग ची  आई असल्याच एका "निर्मल बाबा " वर २० लाख रुपये खर्च करून त्याच्या कँसर चा इलाज करून घेत होती !!
भारतीय लोकांचा भोळे-भाबडे पणा का मुर्ख पणा हे समजणं अवघड आहे ... भारतीय संस्कृती च्या नावाने काय वाट्टेल ते चालू आहे हे मात्र खरं. भोळेपणा .... भाबडेपणा ... असुरक्षितता ... कुठे घ्या विषाची परीक्षा ... सगळे करताहेत नमस्कार आपण हि करुया.... हि असली सगळी कारणे देत लोकं स्वामी , बाबा ..महाराज ..असल्या लोकांच्या नादि लागतात .... "सोशल प्रेशर " असे हि म्हणता येईल कदाचित ...
ह्या गोष्टी ला कोणीही अपवाद नाही ... दिल्लीवाले ..नॉर्थ वाले .. साउथ वाले ...मद्रास वाले ..बंगाली .. गुजराती .. मराठी ... अजून कुठल्या भारतातल्या प्रांतातले ...सगळ्यांचे आप-आपले "स्वामी - गुरु - महाराज " ... सगळे ह्या "आंधळ्या - भक्ती " ला लाचारीने स्वीकारत आहेत .. काही तर गर्वाने मिरवीत आहेत !
एक गोष्ट चांगली आहे कि आता हा भोंदूपणा बाहेर तरी आला आहे ... त्यामुळे नवी पीढी जरा तरी विचार करून असल्या "मार्गा" ला लागेल अशी आशा आहे !




   

Saturday, April 7, 2012

ताऱ्यांचे बेट : वेगळ्या वळणाचा अवाक करणारा अनुभव



२०११ एप्रिल मध्ये प्रकाशित झालेला "ताऱ्यांचे  बेट" हा सिनेमा अचानक आज बघायला मिळाला ! एकदम खिळवून ठेवणारी कथा आणि कथानक ... डीव्हीडी बघायला सुरवात केली आणि सिनेमा संपे पर्यंत भान हरपले. सिनेमा अंतर्मुख करणारा .. विचार करायला लावणारा ..
साधेपणा , निरागसतां , भाबडेपण .. एकदम काळजाला शिवणारं ....
मजबूत पण साध्या वळणाची पटकथा ( सौरभ भावे )  , साजेसं दिग्दर्शन ( किरण यज्ञोपवीत ) हे किती प्रभावीपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतं हे ह्या सिनेमा मुळे जाणवलं. मला ह्या सिनेमातील "सॉफ्ट" संगीत (नंदू घाणेकर/ नरेंद्र भिडे ) आणि सिनेमेटोग्राफी (सुधीर पळसाने) हि आवडली.
एखादं पुस्क्तक जसं एकहाती वाचून संपवतात तसा मी हा सिनेमा डीव्हीडी टाकल्या पासून खुर्ची वर खीळवलेल्या अवस्थेत जवळ जवळ अचाट होवून , मध्यंतर न घेता पाहिला.... थेटरात नाही पाहिला हे एका दृष्टीने बरच झालं .... पाणावलेले डोळे आणी एक प्रकारची सुन्नता , विचार करायला लावणारी शांतता ह्या मुळे पुढचे एक-दोन तास  मी अवाक होवून एकांतात घालवले .. सिनेमा नी मला पुरता विळख्यात बांधून ठेवलं होतं !
कास्टिंग करतानाच दिग्दर्शकाची प्रतिभा जाणवली ... कलाकारांनी तर कमालच केली आहे...साधी सुटसुटीत ऍकटींग ..सिनेमा ला एका वरच्या स्तरावर घेवून जाते ..
ह्या सिनेमाची प्रोड्युसर " हिंदी सिरीयल वाली " एकता कपूर आहे हे समजल्या वर एक सुखद धक्का बसला.
सचिन खेडेकर नी अप्रतिम काम केलं आहे ... जोडीला अश्विनी गिरी आणि अस्मिता जोगळेकर त्यांच्या रोल मध्ये एकदम "फिट्ट" बसल्या आहेत !
ओमकार च्या रोल मधला इशान तांबे चा  सहज-सुलभ अभिनय एकदम आवडून जातो ... कुठे तरी आपल्या बालपणा ची आठवण करून देतो ...
तीन सीन्स-सिक्वेन्सेस  मला एकदम आवडले : आई नी ओमकार ला मारलेली थप्पड , वार्षिक परीक्षे चा सिक्वेन्स आणी गणपती मंदिरातील सिक्वेन्सेस !
सिनेमात कुठेही बट - बटीत पणा नाही ..साधी सरळ कथानक ..खिळवून ठेवणारी कथा , काळजाला भिडणारी ... चटका लावून जाणारी पेशकारी .. अजून काय हवं सिनेमात ? "अजून थोडा वेळ सिनेमा हवा होता  शेवट एकदम पटकन झाला" असं प्रेक्षकाला वाटतं हिच ह्या सिनेमा च्या यशाची ची पावती  आहे !
मला "ताऱ्यांचे बेट " प्रचंड आवडला !




Tuesday, April 3, 2012

पटली पाहिजे अंतरीची खूण


नुसत्या स्वरांच्या आर्तते मुळे ..एखादं गाणं पटकन आपल्या डोळ्यात पाणी आणतं ... ह्यात स्वरांचा  , संगीताचा, शब्दांचा ,कलाकारांच्या प्रतिभेचा  का ऐकणाऱ्याच्या भावनिक सर्जनशिलतेचा भाग आहे  हे समजणं कठीण आहे ...असो ! झटकन डोळे पाणावतील.. म्हणून गाणं ऐकण्या पूर्वीच काळजी घ्या!

गीत : आचार्य अत्रे , संगीत : वसंत देसाई , स्वर : आशा भोसले ,अभिनेत्री :वनमाला , ह्या सर्वांना त्रिवार सलाम !


भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण


सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
कळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती जी खरी ती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी....भरजरी ग ...




चित्रपट : श्यामची आई (१९५३)


हेच गाणं एका छोट्याशा मुलीने फार छान म्हटले आहे ! तिने घेतलेल्या "जागा" आणि तिचा गोड आवाज ..एकदम मस्त !


ह्या  छोट्या मुली ( अन्वी ) ला अनेक शुभेच्छा !


Monday, April 2, 2012

भैरव ते भैरवी : एक सुंदर कार्यक्रम


आज पं विजय कोपरकर यांचा भैरव ते भैरवी हा अप्रतिम  कार्यक्रम पाहण्याचा योग आला ! ह्या कार्यक्रमात न आवडण्या सारखं काहीच नाही ! संकल्पना , कलाकार , पेशकश , निवेदन सगळच अतिशय उच्च स्तरावरचं वाटलं. सर्व  कलाकार गुणी, प्रतिभावंत  आणि अभ्यासी वृत्तीचे जाणवतात ,संयोजन एकदम सूत्रबद्ध असं ( मिलिंद ओक , डॉ समीर कुलकर्णी , आशिष मुजुमदार ) , वादक कलाकार आणि गायक हे पूर्ण तयारी चे असे , स्वतः पंडित कोपरकर हे केवळ तीन -चार मिनटात एखादा राग पूर्ण पणे मांडतात आणि  प्रेक्षक मंत्रमुग्ध होवून जातात ... राहुल सोलापूरकर आणि पौर्णिमा मनोहर ह्यांचं निवेदन म्हणजे दुग्ध-शर्करा योग ... वादकांची मोजकी आणि सुरेख साथ हे सगळं सुरेख जमून आलं आहे . पं कोपरकरांची प्रतिभा आणि ज्ञान हे कार्यक्रमाच्या  प्रत्येक क्षणा ला जाणवते..
तीन तास पटकन गेले असं वाटतं .... हा कार्यक्रम ५ तासांचा केला तरी प्रेक्षकांना तो आवडेल ..
आजचा  कार्यक्रम  कवी ग्रेस यांना समर्पित होता .. सर्व गुणी आणि प्रतिभावंत कलाकार एकत्र आले कि काय अप्रतिम पेशकश होऊ शकते हे भैरव ते भैरवी हा कार्यक्रम बघितल्या शिवाय कळणार नाही ...
साहित्य , कला , संगीत  ह्या विषयी कण भर जरी रस असेल तर हा कार्यक्रम जरूर बघावा ...
दत्त प्रसाद रानडे  आणि  सायली पानसे हे गायक आपल्या उपशास्त्रीय गायनानी  पं कोपरकरांना पोषक साथ करतात ...आणि टाळ्या हि घेवून जातात .... तबला (प्रसाद जोशी )  , वायोलीन्स  (राजेंद्र भावे )  , ताल वाद्य , सिंथ (केदार परांजपे ) वाजवणारे कलाकार  सुरेख साथ देतात आणि दाद घेवून जातात ..

मी  ह्या कार्यक्रमाला  ए - वन ग्रेड दिली आहे आणि  फॅन झालो आहे ! "प्रत्येकाने जरूर पहावा असा कार्यक्रम" म्हणून मी शिफारस करीन ! संगीत तुम्हाला अज्जिबात कळत नसेल किंवा फार कळतं असं वाटत असेल तरी हा कार्यक्रम तुम्हाला खूप काही शिकवून जाईल .. आनंदित करेल ..आवडेल !
पुण्यात जेव्हा - जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा मी नक्की पाहीन हे नक्की !
आज राम नवमी ला संगीताचे दोन अप्रतिम कार्यक्रमांची  भेट मिळाली : भैरव ते भैरवी (५ ते ८) आणि नंतर हृदयनाथ चा भावसरगम (८ ते १० )

Thursday, March 29, 2012

खाद्य भ्रमंती भाग २


पुण्यातील पेठान मधून फिरताना मी जरा भावूक होऊन जातो... सदाशिव , नारायण , शानिवारातील ते जुने दिवस समोर उभे राहतात ..काळा च्या ओघात  पुसल्या  गेलेल्या पण  ओळखीच्या वाटणार्या खुणा शोधत .... ते जुने वाडे , गल्ल्या , बोळ  मनात परत बांधत  मी तासंतास मनसोक्त फिरतो ... ओळखीच्या चवी आणि ते तसेच ओळखीचे वाटणारे लोक भेटले कि देह भान विसरायला होते ..
दगडूशेठ संगीत उत्सवा च्या निमित्ताने असेच परत रामणबागेत जाण्याची संधी मिळाली आणि मी खाद्य भ्रमंती ला सुरवात केली ...
( ह्या पूर्वी ची खाद्य भ्रमंती, पुणेरी मिसळ , अमृततुल्य   )
प्रभा विश्रांती गृह हे म्हणजे अस्सल पुणेरी दुकानाचा नमुना आहे ... मालकाला त्याच्या मालाचा प्रचंड अभिमान , येणारे  गीर्हाईक  हे केवळ आपला माल अद्वितीय आहे म्हणून येते हि खात्री .. कस्टमर सॅटीसफॅक्षन वैगरे क्षुल्लक बाजारी गोष्टीन कडे काना डोळा करत मस्त पैकी गल्ल्या वर बसणारे मालक बघायचे असतील तर प्रभा विश्रांती गृहा ला जरूर भेट द्यावी .. आवर्जून बटाटे वडा खावा ! मग आपल्याला समजतं कि चांगलं प्रोडक्ट असलं कि मालक का एवढा "माज " करू शकतो ते ! बटाट्या वड्या  बरोबर पाव आणि रस्सा ..थोडी मिसळ .. जमलंच तर साबुदाणा वडा हे ओघाने आलेच ..
पूर्वी इथे बटाटा कचोरी मिळायची ती आता बंद केली आहे मालकाने ...ओलं खोबरं आणि बटाट्याचे आवरण असलेली हि कचोरी म्हणजे प्रभा विश्रांती गृहा चा ट्रेड मार्क होती !
 रमण बागे कडून लक्ष्मी रस्ता ओलांडला कि  कुमठेकर रस्त्या ला माझ्या लहानपणी एक खाद्य मेजवानी असायची .. पेशवाई .. सुजाता ..मधे विश्वेश्वराचं मंदिर ..दोन पाण्यानी भरलेले ..मोठ्ठे... मासे तरंगत असलेले दगडी हौद ..पुढे  स्वीट होम ..
ह्या पैकी  आता फक्त स्वीट होम उरलं आहे त्याच्या नव्या वेशात .. न्यू स्वीट होम ..इथलं इडली-सांबार शेव अजून हि ती जुनी चव टिकवून आहे ... इडली सांबार घेताना आवर्जून शेव प्लेट घ्या व सांबारा वर तवंग जरा कमी टाकायला सांगा.. शेवटी एक प्लेट दहीवडा खायला विसरू नका...
पुढे उजवी कडे वळल्या वर "श्री मिसळ" हे प्रसिद्ध खाऊ-ठिकाण आहे .. इथे काय काय म्हणून खाऊ असं होतं ... कोकणी ओल्या नारळाची चव इथल्या प्रत्येक पदार्थात आहे .. मिसळ , साबुदाणा वडा , रस्सा , आणि विशेष म्हणजे इथे मिळणारी हिरवी नारळ-मिरची ची चटणी ..
वरील पैकी कुठल्याच ठिकाणी चांगला चहा मिळत नसल्या मुळे ... चहा साठी .. पेरुगेट रस्त्या वरील ... नर्मदेश्वर , व्याडेश्वर  पैकी कुठल्या "अमृततुल्यात " जाणं हे ओघाने आलेच ....
तोच रस्ता पुढे रमण बागे कडे घेवून येतो... खाण्या नंतर गाणं ऐकायला नको ?

आज आहे जसराज ... उद्या शौनक अभिषेकी .. आणि १ एप्रिल ला हृदयनाथ !

Thursday, March 22, 2012

पुण्यात नव्या वर्षाचे स्वागत विविध संगीत मैफिलीतून


२२ मार्च संध्या ६.३० : विजय कोपरकर  (गरवारे कॉलेज )

२३ मार्च पहाटे ६.३० : श्रीधर फडके गुढी पाडवा पहाट :गीत रामायण  ( बाल शिक्षण मंदिर , कोथरूड )

२३ मार्च संध्या ६ : शंकर अभ्यंकर : धन्य धन्य शिवराय  ( विवेकानंद सभागृह , एम आय टी )

२३ मार्च ते २५ मार्च  रोज संध्या ५.३० : पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव  ( घरकुल लॉंन्स )
( मुख्य आकर्षण .. मोहन दरेकर , रोणू मजुमदार , फ्युजन संगीत )

२३ मार्च - २४ मार्च  संध्या ६ : सुदर्शन संगीत महोत्सव - बंदिशकार  उत्सव  ( सुदर्शन रंगमंच )

२४ मार्च संध्या ६ : चिमणराव ते गांधी  : दिलीप प्रभावळकर बहुरूपी टॉक शो (कर्नाटक स्कूल सभागृह )

२५ मार्च संध्या ५.३०  : "आलाप "  ( कर्नाटक स्कूल सभागृह )

गुढी पाडवा ते राम नवमी : रोज संध्या ६  : दगडूशेठ संगीत उत्सव   ( रमण बाग )
( मुख्य आकर्षण : जसराज , हृदयनाथ , शिवकुमार शर्मा  आणि अनेक दिग्गज )

Tuesday, March 20, 2012

उन्हाळ्यातली खाद्य भ्रमंती ...


उन्हाळा जाणवायला लागला आहे तसं  निरा , लिंबू सरबत , जीरा- सोडा , ताक, झालच तर थम्बस अप , माठातलं थंड गार पाणी , कैरी पन्हं  असले स्टॉल्स गावात जागो जागी बघायला मिळत आहेत ... पण माझं लक्ष वेधून घेतलं ते नव्याने निघालेल्या "सोडा - शॉप " नी .. ह्या दुकानात ९० प्रकारचे सोडा फ्लेवर्स मिळतात ... मला आवडलेले फ्लेवर्स म्हणजे .. पान फ्लेवर , कोका -कोला फ्लेवर , कॉफी-बीअर ... अजून बरेच फ्लेवर चाखून बघायचे आहेत .. उन्हाळा संपे पर्यंत सगळे ९० फ्लेवर होतील चाखून !
बरेच  दिवसात  "जनसेवा" त गेलो नव्हतो .. आज जाण्याचा योग आला ... जनासेवाची ट्रेड मार्क असलेली ... बाटलीत मिळणारी लस्सी आजकाल मिळत नाही ... पण "जनासेवा" चा झालेला "मेकोवर " पाहून मन प्रसन्न झालं ... बोलता बोलता बरचं खाणे झाले... दडपे पोहे, निखट सांजा ,कांदे पोहे , कांदा-बटाटा रस्सा पुरी , श्रीखंड -पुरी , बटाटे वडा, मॅन्गो लस्सी ..
नव्या युगाशी जनसेवा नी स्वतः ला जमवून घेतलं आहे... स्वच्छता , अस्सल पुणेरी - मराठी पदार्थ  आणि चव हे जनसेवा नी अगदी पूर्वी पासून .. अगदी "जनसेवा दुग्ध मंदिर" असल्या पासून जोपासलं आहे.
नव्या जमान्या शी जुळवून घेत सेल्फ सर्विस ची एक वेगळी पद्धत , क्रोकरी हि "चायनीज टेक अवे " पद्धतीची , बँकेत असते तशी कुपन सिस्टीम , डिस्पोजेबल ग्लास , चमचे इ ... सगळ बघून जुन्या जनसेवे ची आठवण  मला आली ते काही नवल नाही ...  ऑरडर दिल्यावर १५ मिनिटे  थांबवायची प्रथा मात्र सच्च्या पुणेकरा सारखी राखली आहे ...
जनासेवातच एक अतिशय दयनीय असा प्रसंग अनुभवास आला... एक वयस्कर जोडपं आपल्या ४-५ वर्षाच्या   ( एन आर आय ) नातवा ला घेवून बसलेले दिसले . तो नातू म्हणजे एक अतिशय लाडावलेला कार्टा आहे हे जाणवत होतं .... इंग्रजीत ज्याला "अब्नोक्षिएस " म्हणतात तसं होतं ते कार्ट.... सारखं त्या आज्जी-आजोबांना ओरडत होतं आणि चिकन-सॅन्डव्हीच  मागत होतं... बोली वरून म्हातारा म्हातारी अस्सल "एकारांती" वाटत होती ..थोडे लाजल्या सारखे वाटत होते .. "तसलं" काही खात असतील असे वाटत नव्हते .. पण ते कार्ट काही केल्या आज्जी - आजोबांचे ऐकत नव्हते .. काहीही व्हेज खायला तयारच नव्हते ... आजोबां कडे बघून त्यांचा त्यांच्या नातवा बद्दल झालेला भ्रम निरास जाणवत होता !



Sunday, March 18, 2012

देऊळ


देऊळ ..एकदम आवडला ..तिरकस विनोदि ..पण झोंबणारं सामाजिक सत्य अतिशय सहज रित्या दाखवणारा चित्रपट .... स्क्रिप्ट आवडली !
गिरीश कुलकर्णी च काम  आवडलं !
सोनाली कुलकर्णी  भूमिके  मध्ये पूर्ण पणे शिरल्या सारखी वाटते ,"अप्सरा आली" मधली हीच का ती मादक अप्सरा ? का तिचं हे  अस्सल गावरान रूप ? झकास झालं आहे काम !
दिलीप प्रभावळकर आता प्रत्येक भूमिकेत "प्रेडिक्टेबल" झाला आहे ! कुठल्या हि चित्रपटात दिलीप प्रभावळकर त्याच वेशात -भूमिकेत जाणवतो.
नाना पाटेकर कधी नव्हे तो मला आवडला . नेहमीचा  चीड-चीड्या, जगाला कंटाळलेला नाना "हटके " भूमिकेत लक्ष वेधून गेला !

बोचरा विनोद ...जो एक प्रकारे टीका करण्यासाठी अतिशय प्रभावी अस्त्र बनू शकतो, त्याचा सुंदर वापर दिग्दर्शक, स्क्रीन -प्ले , स्क्रिप्ट -रायटर  यांनी केला आहे !

गेल्या  दोन-तीन  दिवसात बरेच  मराठी सिनेमे बघून झाले .. शाळा , देऊळ , मुंबई-पुणे-मुंबई , फक्त लढ म्हणा, झेंडा , झकास ,तरुण तुर्क -म्हातारे अर्क , बालगंधर्व ...   देऊळ एक चांगला अनुभव वाटला !

  

शाळा


शाळा ..पुस्तक वाचलं नव्हतं ... सिनेमा ला अनेक  बक्षिसं मिळाली म्हणून बघितला ... पुस्तक वाचलं नव्हतं हेच बरं ...

जोशी चं काम आवडलं
शिरोडकर खुपच छान आणि गोड वाटली
जितेंद्र जोशी च काम आवडलं


कालच मी इंग्रजी मध्ये एक पोस्ट लिहिली होती ... मालगुडी डेज आणि वंडर इयर्स बद्दल ...सारखं कुठेतरी  "शाळा " , "मालगुडी डेज " , "वंडर इयर्स " मध्ये  कुठे तरी साम्य वाटलं
सिनेमा आवडला ..यंग रोमांस ..बाल कलाकारांचं  काम मस्त आहे ..
इमोशनल टच  मुळे पटकन आवडून गेलेला
कधीतरी शाळेत गेलेल्यानी  आवर्जून बघण्या सारखा सिनेमा

Friday, March 16, 2012

पु ल प्रेमींना आवाहन


पुलं च्या साहित्यात , व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकात भेटलेली अनेक व्यक्तिचित्रे  घेवून एक संहिता ( स्क्रिप्ट) लिहायला घेतली आहे.प्रायोगिक  स्तरा वर आणि पुल प्रेमी "हौशी" साहित्तिक एकत्र जमून ,एक ग्रुप म्हणून असं स्क्रिप्ट  लिहिण्याचा मानस आहे ..
पुलं च्या साहित्या चे अनेक प्रेमी पुण्यात आहेत.. अनेक अभ्यासक हि आहेत .. प्रत्येक व्यक्ती चित्रात एक स्वतंत्र संहिता आहे ... जर असे हौशी साहित्तिक आठवड्यातून एकदा  एकत्र बसून चहाचा घोट घेत ..आपली प्रतिभा कागदावर उमटवू शकले तर फार मजा येईल. निदान सर्व पुलं साहित्य प्रेमींचा एक कट्टा तरी नक्की जमेल !
अशा प्रकार च्या विचारातून मी पुण्यातील पुल प्रेमींना एक आवाहन करत आहे ..
असा हौशी साहित्तीकांचा कट्टा पुण्यात (च !) भरू शकतो ... असा कट्टा जमवण्याची माझी इच्छा आहे . जर  कोणाला अशा प्रकारच्या "गृपिझम " मध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर माझे त्यांना आग्रहाचे निमंत्रण !
ह्या पोस्त ला उत्तर म्हणून आपला अभिप्राय कळवा ... ट्विटर किंवा इमेल ने कळवले तरी चालेल.
शनिवार / रविवार /गुरुवार ह्या पेकी कुठला दिवस जमू शकेल ते हि कळवा

जर तुमचा एखादा "पुलं साहित्य प्रेमी " मित्र / मैत्रीण अश्या उपक्रमात भाग घेण्यास इच्छुक असेल तर कृपया त्यांना हि जरूर कळवा  हि कळकळीची विनंती !



Wednesday, March 14, 2012

मुढचेता नराधम

अनाहूता प्रविशन्ति अपृच्च्हो बहुभाष्यते
अविश्वसते विश्वासिती ,मुढचेता नराधम !

बोलावण्या विना जो घरात येतो ... न विचारता खूप बोलतो ... ज्यांच्या वर विश्वास ठेवायला नको असल्या लोकान वर विश्वास ठेवतो ....असा माणूस मृत बुद्धीचा व अधर्मी समजावा   !





Monday, March 12, 2012

थेंब


मनांत नाही
मुळीच माझ्या कांहि ;
फक्त वाजते आहे :
नितळ लाजरे ओले पाउल
एक चिमुकल्या थेंबाचे.

पाडगावकर
१९५३



Sunday, March 11, 2012

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे

गेल्या काही दिवसात अनेक जुने सिनेमे व नाटकं पाहण्याचा योग आला : वासुदेव बळवंत फडके ,घाशीराम कोतवाल, रायगडाला जेव्हा जाग येते ,हि श्रींची इच्छा ,इथे ओशाळला मृत्यू ,रणांगण ...आणि  २२ जुने १८९७

"गोंद्या आला रे  ...गोंद्या आ ..ला रे"
२२ जुने १८९७ मधील हे  शब्द ऐकले कि अंगा वर एक विचित्र  शहारा असा येतो...उसळून येते रक्त .....

" धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
  अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे " 

शंभर वर्षान वर उलटून गेली तरी अजून परिस्थिती काही फार वेगळी नाही ... गोरे जाऊन काळे आले ... एवढाच  काय तो फरक.. आज असे "रँड" सर्वत्र दिसताहेत .. चाफेकर मात्र विरळच .. कधी कधी वाटतं .. व्यर्थ गेलं ह्या वीरांच बलिदान ..  वासुदेव बळ वंतानी सांगितलेले शेवटचे शब्द हि तंतोतंत तसेच खरे होत आहेत...

" आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
  अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! "




नपुसक मराठे दिल्लीत जाऊन कुठल्या इटालीयन बाई चे तळवे चाटताहेत .. शिवाजी तानाजी ची वंशावळी सांगणारे आज इतिहास विसरून मुजरे करताहेत यवनांचे !   दळभद्री  नार्या  "मातोश्री " सोडून इटा लीयन झगे धुतो आहे ... राज्यात अनेक पिसाळ लेले "सूर्याजी " आणी माजलेले "भुजबळ" स्वतः च्या पिल्लांना घेवून मोकाट फिरत आहेत .. वाघाच्या पिल्लांवर भुंकण्याची हिम्मत करत आहेत ...
बाहेरील अनेक बांडगुळं आमच्या भूमिपुत्रांना लुटत आहेत आणि "कृपा " करून करोडो जमवत आहेत ..
महाराष्ट्रातील युवक मात्र झिंगलेल्या अवस्थेत निद्रस्थ आहे ... गाणी - बजावणी -नाच - सासू सुनेच्या रडक्या सिरिअल्स - फेसबुक  ह्या मध्ये मश्गुल आहे ...

"आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
 अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली "

नुसत्या शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुका काढून बाकीचे वर्षभर "येरे माझ्या मागल्या " असे करून उपयोग नाही ... नव्या समाजाची .. नव्या राष्ट्र निर्माणाची  ... महाराष्ट्र निर्माणाची ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे !
क्रांती चे निखारे धग-धग तील आणि  वणवे पेटतील ...   लवकरच  हि झोपलेली युवा शक्ती जागी होईल.... आणि बोथट झालेल्या ..गंजलेल्या तलवारिना धार लावेल ...यवनांना परतवून लावेल... माजलेल्या राज्य कर्त्यांना जागा दाखवेल ... 
अश्या नव्या महाराष्ट्र निर्माणाचे ,राष्ट्र निर्माण करण्याचे व्रत घेणाऱ्यांसाठी अनेक शुभेच्छा  आणि आई जगदंबे  समोर प्रार्थना 

आई आंबे जगदंबे जातो सत्कर्मी ..जयदे 
रिपू  दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे 

आम्हा नाही तुझ वाचोनी कोणी जगी आसरा 
पुण्य पतनी धर्म बुडविला रँडा ने सारा 

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे !







Saturday, March 3, 2012

जिप्सी


एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतीच्या जगात
उडे खिडकी मधून दूर दूरच्या ढगात
झाडे पानांच्या हातांनी होती मला बोलावीत

कसे आवरावे मन ? गेलो पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आणि पुढे कशासाठी गेलो घर मी सोडून ?
सारी सारी सुखे होती , काही नव्हतेच न्यून
पण खोल खोल मनी कुणी तरी होते दुः खी
अशा सुखात  असून जिप्सी उरला असुखी

वातासावे त्या पळालो सारे काही झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

घर असूनही आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणी सांगावे ? असेल पूर्व जन्मीचा हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप ...

कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून ..
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


कवी मंगेश पाडगावकरांची १९५२ साली लिहिलेली .. " पाडगावकर " शैलीत  नसलेली  जिप्सी ह्या कविते तील काही निवडक ओळी !  ( हि कविता सुधीर मोघ्यांनी लिहिली आहे असे कोणी  सांगितले तरी  नक्की विश्वास बसेल !)



Wednesday, February 29, 2012

क्विक मार्च


मार्च महिना एकंदरीत बराच व्यस्त व महत्वाचा ठरणार आहे ! क्रिकेट , राजकारण , अर्थ व्यवस्था ह्या सर्व स्थरा  वर घटना अपेक्षित आहेत ...
उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार १ तारखेला संपला कि राजकीय ढवळा-ढवळी  ला सुरवात होईल. 
उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुका देशातील अनेक समीकरणे बदलणार्या ठरतील असे वाटते . शेवटचा व ७वा टप्पा ३ मार्च ला उरकला कि देशाचे लक्ष ६ मार्च च्या मतमोजणी व निकाला कडे लागलेले असेल. महाराष्ट्रात भाजप शिवसेने ला राम राम म्हणण्याच्या तयारीत आहे ! नासिक , मुंबई व इतर महापौर पदाच्या निवडणुकीत बरेच से चित्र स्पष्ट होईल.
राजकारण आणि देशाच्या अर्थ कारणा साठी  संसदेचे अर्थ संकल्पीय अधिवेशन अतिशय महत्वाचे ठरू शकेल.

२ मार्च चा ओस्ट्रेलिया-श्रीलंका सामना हा भारताच्या क्रिकेट साठी महत्वाचा ठरू शकतो. ८ तारखेला होळी च्या दिवशी लोक कोणाच्या नावाने बोंबा मारतील हे ह्या सामन्या वर अवलंबून आहे !

५ ते १६ मार्च ह्या कालावधीत : केंद्रीय अर्थसंकल्प , महाराष्ट्रातील महापौर पदाच्या निवडणुका , उत्तर प्रदेशातील विधान सभा निवडणुकांचे निकाल , क्रिकेट च्या सी बी कप ( ऑस) व एशिया कप ( बांगलादेश) ह्या स्पर्धा , होळी, धुळवड, रंगपंचमी .. आणि पुढे २३ तारखेला पाडवा ... बोलता-बोलता पुढचे वर्ष उभे राहणार .. असा मार्च घोड दौड करणार आहे ! व्हा तैयार !


Monday, February 27, 2012

किंगफिशर ची साहित्याला देणगी



किंग फिशर हि खरं म्हणजे माझी  आवडती एअर लाईन होती ... तिथे अनेक युवकांना आणि मनानी सदैव तरुण असणार्यांना "एयर " हि मिळायची आणि "लाईन" हि.. 
इंडिअन ऐअर लाईन्स आणि जेट च्या "बर्ण्यान" पुढे लाल , तंग स्कर्ट मधील किंगफिशर च्या हवाई सुंदर्या नावाला साजेश्या होत्या. तेवढ्या साठी अनेक मंडळी प्रवासाचे बेत आखायची ... किंगफिशर च्या हवाई पर्यांची फिगर बघत , टीव्ही च्या पडद्या वर दिसणाऱ्या   दाढीवाल्या गलीच्च्छ  मल्या कडे दुर्लक्ष करणे सहज शक्य होते.    २००४ - २००८ पर्यंत किंगफिशर चं भाडं हि अगदी माफक असायचं ! बहुतेक म्हणूनच किंगफिशर ची आजची स्थिती उद्भवली असावी ! आज किंगफिशर बुडीत निघाली आहे त्याचे दुखः आहेच पण त्या मुळे पुणेरी मराठी ला अनेक शब्द प्रयोग भरभरून मिळाले आहेत ह्यात आनंद हि आहे ! मराठीत आलेले काही नवे शब्दप्रयोग ...

सदैव  किंगफिशर मध्ये बसलेला इसम = बाता मारणारा एखादा "सोश्यल एक्स्पर्ट " , नेहमी २०००० फुटावरून उडणारा एक किडा 
उदा :   अण्णू परांजप्या सदैव किंगफिशर मध्ये बसलेला असतो !

"के एफ"  गिरी करणे : माहिती नसताना धंद्यात पडणे , नाक खुपसणे ,माहिती नसताना एखाद्या विषयावर बोलणे
उदा :  अण्णू परांजपे चा लबाड मुलगा दिवस-रात्र ट्विटर आणि फेसबुक  वर "के एफ गिरी " करत असतो !
संबंधित शब्द प्रयोग :  झारापकर गिरी करणे : उगाचच झेपत नसलेले काम हाती घेणे
( क्षितीज झारापकर : कुप्रसिद्ध गोळा बेरीजकार)


धंद्या चा किंगफिशर होणे= बुडीत निघणे  
उदा :  अण्णू गोगट्या च्या दुकानाचे किंगफिशर झाले !

किंगफिशर सारखी लाल करणे = काही कारण नसताना उगाचच पुढे पुढे करणे
उदा :  रानड्यांची सोनाली नेहमी सार्वजनिक समारंभात सगळीकडे किंगफिशर सारखी लाल करत असते !

किंगफिशारी ( ठाकरी भाषे प्रमाणे) : नुसती बोलबच्चन गिरी करणे , वायफळ चर्चा करणे 
उदा :  अमेरिकेतील लेले आणि पुण्याचे परांजपे हे पुणे म न पा च्या होऊ घातलेल्या निवडणुकांन बद्दल ..डेक्कन जिमखान्या वर अर्धी- अर्धी कॉफी चेपत  किंगफिशारी करत होते !


किंगफिशर : भरपूर मेक अप व खलास टंच कपडे घातलेलेली  तरुणी  
उदा :  अरे दिलप्या ...तो पक्या म्हणत होता फर्ग्युसन ला आणि बी एम ला निस्ता किंगफिशर चा घोळका असतो !

एक म्हण :
नावाची टीचर... आहे खरी किंगफिशर 
अर्थ : विषयाचे ज्ञान नसलेली , पण चांगली फिगर असलेली आणि टंच कपडे घालणारी एखादी शिक्षिका / लेक्चरर 





आज मराठी भाषा दिवस


आज मराठी भाषा दिवस ... माझ्या मनातलं सगळं ..थोडक्यात  विदेश यांच्या  लेखन प्रपंच वरील चार ओळीतून व्यक्त होत आहे...


सुरेख उत्तम वा वा छान
 म्हणत वाहवा करू -
 जमेल तेथे मायमराठी
 आपण जवळ करू !

                                          मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस !
                                          मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया !
                                          मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक !
                                          मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब !
                                          मराठी नेता गरजला- व्हेरी गुड !
                                          मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! 

भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी           

आज मराठी भाषा दीन
आज मराठी भाषा दिन !




Friday, February 24, 2012

त्याला जीवन ऐसे नाव


दोन घडी चा डाव ..
त्याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे  आपण
रंक  आणिक राव


माळ यशाची हासत घालू
हासत हासत असेच झेलू
पराजयाचे घाव
झेलुया पराजयाचे घाव
त्याला जीवन ऐसे नाव


Thursday, February 23, 2012

परिस्थिती



माणसावर परिस्थिती कधी कधी इतकी वाईट येते कि,
'हा माणूस तुटून जाईल कि काय?' अशी भीती निर्माण होते.
सगळे मार्ग बंद होतात,वाट दिसेनाशी होते,
मिळालाच एखादा मार्ग तर त्या मार्गातल्या काट्यांतून रक्तबंबाळ झाल्यावर 'तो मार्ग चुकीचा होता'
याची प्रचिती येते....'दुष्काळातला तेरावा महिना म्हणजे काय ते कळतं'
आठवण,दु:ख,गरिबी,अपयश हे सगळे गुंड एकाच वेळी एकाच माणसावर चाल करून येतात.
सगळं काही निराशवादी झालं कि, 'आता काही इलाज नाहीयेय' याची खात्री आधीच झालेली असते.
अश्या परिस्थितीत थोड्या वेळासाठी स्वतः त्या सर्व परिस्थितीतून बाहेर उभं राहायचं,
आणि
उभं राहून परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करायचं...
खरंच परिस्थिती कधीकधी 'Standing Ovation' साठी हकदार असते..
म्हणायचं कि,
"वाह.....परिस्थिती यावी तर अशी यावी....
एखाद्याची गळचेपी करावी तर अशी करावी....कोंड करावी तर अशी करावी.
एक मार्ग...एक मार्ग मोकळा नाही सोडायचा."
आणि परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करून झालं कि,
शेवटी स्वतःच स्वतःचं कौतुक करायचं कि,
"आपल्याकडे गमावण्यासारखं इतकं काय काय होतं,
आपल्याला झुकवण्यासाठी परिस्थितीला पण इतके कष्ट करावे लागले.
आपणही इतके अफाट आहोत..."
दु:खाच्या दरबारात वास्तव आणि मृगजळ उघडं पडतं....

व पु 






Wednesday, February 22, 2012

हवाहवासा वाटणारा एकटेपणा



माणसाचं मनच मोठं विचित्र...

त्याला एकटेपणा नकोसा असतो... पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो...

कितीही नाही म्हटलं ना तरी जीवनाचा अर्थ त्याला त्या एकांतातच मिळतो... कारण गर्दीत जरी तो स्वतःला हरवायला शिकत असला ना तरी एकांतात तो स्वतःला सापडायला शिकतो... अन तसं बघितलं तर एकटा नसतो कोण हो... सगळे एकटेच असतात... सोबती मिळतात ते फक्त काही क्षणांपुरते... कारण प्रत्येकाच गंतव्य वेगळं असतं... अन ज्याच त्याचं गंतव्य आलं ना की मग ते त्यांच्या स्वतंत्र वाटेवर निघून जातात... अन मागे राहतो फक्त आपण... 'एकटेच' !!!




व पु






Monday, February 20, 2012

अहंकाराचा पहारेकरी



कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम प्रथम संवाद करावासा वाटतंच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवत की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वताचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते ह्याचा अर्थच काय? 

वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणिवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एके काळी मैत्री झाली होती ती कारणे, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ, आमंत्रण देत राहतो, पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करत राहतो.

त्या कोण्या एका व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कस? हा एकमेव प्रश्न, अहंकार विचारत राहतो. मग अट्टाहासाने वैर जोपासले जाते. अट्टाहासाने संगोपन केलेले वैर जास्त थकवते. ही सहनशक्तीची कसोटी असते. ह्याचाच जास्तीचा थकवा असतो.

पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडले की अहंकाराची शक्ति कमी होत जाते. त्या र्मैत्रित शब्दांचा प्रवास सुरु झाला की अधून मधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वताची लाज वाटते. पण इथेही पुन्हा शब्द विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड़,संकोच,अबोला.... ही एक एक वस्त्र उतरवली जातात..... फाटक कायमचे उघडले जाते.

वपुर्झा -- व. पु. काळे

Saturday, February 18, 2012

मराठी पण भारतीय





मी भारता बाहेर अनेक वर्षे राहीलो . तिथे माझी ओळख फक्त भारतीय म्हणून होत होती. पण खरं तर माझ्या खर्या "स्वतः " ची ओळख हि मला माझ्यातील संस्कृतीतूनच जाणवत होती. मी भारतीय आहे हे मला माझ्या तील मराठीपणा तूनच जाणं वत होतं !
हि  सांस्कृतिक जडण घडण : मग ते ग दि मा , पु ल, व पु  असोत किंवा एखादे बडबड गीत असो, ज्ञानबा -तुकाराम - एकनाथांचे एखादे लहानशा ओवी मध्ये लपलेला जीवनाच अर्थ असो किंवा सुधीर मोघे ,संदीप खरे सारख्या एखाद्या कवीच्या काळजाला लागलेल्या दोन ओळी असोत ... माझे भारतीयत्व मला माझ्या भाषा-संस्कृती मुळेच जाणवते.
मला माझ्या संस्कृतीशी - आवडणार्या भाषेशी एकनिष्ठ राहून स्वतः ची ओळख भारतीय म्हणून सांगण्याची मुभा आहे . मग मी मराठी असेन , बंगाली असेन , गुजराती असेन किंवा आणिक कोणी .. त्या त्या भाषा संस्कृती शी  एकनिष्ठ राहून हि मी भारतीय म्हणून अभिमानाने ओळख सांगू शकतो ... हे असे आहे म्हणून ह्या अनेक  रंग- रूप- वेश- भाषेत ,  विविधतेत भारतीय असल्याची एकता  आहे .
मला माझ्या भाषा-संस्कृती शी प्रेमाने  ,आनंदाने एकनिष्ठ राहण्याचे स्वातंत्र्य  इथे आहे .. त्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदाने, बेडर पणे उपभोग घेणार्यांची मांदियाळी म्हणजेच स्वतंत्र भारत !
माझ्यातील "मराठी पण " हे मला एक भारतीय असल्याची  जाणीव करून देत आहे. 
आणि ...बहुतेक म्हणूनच मी भारतीय आहे.


Thursday, February 16, 2012

महाराष्ट्रातील महत्वाच्या निवडणुका


१६ फेब ला होणार्या नगरपालिका निवडणुका ह्या महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाच्या ठरणार आहेत. २००५ साली स्थापन झालेला पक्ष  " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " हा महत्वाची भूमिका बजावणार आहे.
राज ठाकरे सारखे युवा पण कसलेले मजबूत नेतृत्व महाराष्ट्रा ला मिळत आहे. म न से हा दूरदृष्टी असलेला पक्ष आहे. खंबीर नेतृत्व आणि समाजकारण समजणारा पक्ष आहे.
२०१४ साली होणार्या विधानसभा निवडणुकांची नांदी महापालिकेच्या निवडणुकांन मधून होणार आहे. पुणे , नासिक , ठाणे  आणि मुंबई मध्ये मनसे आपले आस्थित्व दाखवून देईल.
मोडकळीस आलेले जुने पक्ष आणि सेना यांना लवकरच त्यांची जागा दिसेल. नावानी " राष्ट्रवादी " पण अस्सल "जातवादी" पक्ष आज ना उद्या त्याच्या सीमित वर्गा पुरता उरेल. राष्ट्रीय पातळी वर भाजप आणि काँग्रेस , तर महाराष्ट्रात मनसे असे झाले तर नक्कीच महाराष्ट्राचे आणि राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात काहीही शंका नाही.


आज होणार्या निवडणुकीत , मनसे हा एक मुख्य पक्ष म्हणून पुढे येईल . सत्तेचे समीकरण करताना मनसे कडे दुर्लक्ष करून कुठला हि पक्ष सत्ते वर येणे अवघड आहे. मनसे ची घोड दौड २०१२ च्या महानगर पालिके च्या निवडणुकीतून सुरु होईल हे नक्की. 
युवा आणि कसलेले नेते राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहे. त्यांना अनेक शुभेच्छा !





Friday, February 10, 2012

"गोळा बेरीज" माझी प्रतिक्रिया



" गोळा बेरीज " पाहून आलो ... प्रतिक्रिया देणे  अवघड वाटते आहे .. पण प्रयत्न करणार आहे...
आतुरतेने ह्या सिनेमा ची वाट पाहत होतो ... त्या मुळे थोडंसं हिरमुसले पण जाणवतंय .
अपेक्षा भंग झाला असं म्हणणं बरोबर नाही ...कारण पुलंचं साहित्य इतकं वजनदार आहे कि वेळ फुकट गेला असं वाटलं नाही.

राव साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर " ह्या क्षितीज झारापकर नावाच्या दिग्दर्शकाने उगाचच उंटाच्या बुडाला शिवण्याचा प्रयत्न केला आहे. सुमार दर्जा च्या ह्या दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य का हाताळले हे कोडं आहे. त्याने कुठल्या तरी चांगल्या गुरु कडे जाऊन त्यांचे पाय धरावे आणि शिक्षणास सुरवात करावी हे बरे ! "

दोन आयटम नंबर ह्या सिनेमात टाकण्याची काय गरज होती हे समजले नाही. त्यांचा दर्जा हि टुकार होता.. 

एखाद्या शाळकरी मुलांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे काय असं सारखं सिनेमा पहाताना वाटत रहातं. कास्टिंग  बद्दल बोलायचे झाले तर मूळ लेखकांनी वर्णन केलेल्या व्यक्ती रेखा आणि निवडलेले कलाकार ह्यात खूप फरक वाटला.  

सुबोध भावे ने केलेला नंदा प्रधान आवडला. 
सखाराम गटणे हा "एकारांत" बावळट आणि उंच वाटतो ... तो तसा पुलं नि व्यक्ती रेखान्कला नाहीये. तो गहूवर्णी , बुटका हवा होता.
सतीश शहा नि पेस्तोन काका हे गुजराती शेठ सारखे रंगवले आहेत.. त्यांना एक ब्रिटीश वळण हवे होते.. शिवाय ते जरा बारीक हवे होते. ( मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या सारखं )
हरितात्या तर एकदम काहीच्या काहीच वाटले ... टोटल फेल 
दिलीप प्रभावळकर सारखा  जेष्ठ  कलाकार हि  अंतू बरवा सारखी व्यक्ती रेखा रंगवताना कमी पडला असे जाणवते .. त्याचे बोलणे  मुंबई च्या "कोकणी" चाकरमान्यान सारखं   वाटतं .. खरा अंतू बरवा  हा "कोकणस्थी " थाटाने बोलतो ... 
मोहन आगाशे म्हातारा म्हणून ठीक आहे पण "चितळे मास्तर " म्हणून बरा वाटला नाही. चितळे मास्तरांचा सोज्वळ पण ह्या माणसाच्या चेहर्या वर दिसत नाही.
राव साहेब हे व्यक्ती चित्र काही जमले नाही असं मला वाटलं...केवळ चांगल्या डायलॉग मुळे ते निभावून गेले आहे.. गदिमा मात्र छान वाटले !
नारायणा चे काम चांगले झाले आहे .. बबडू हि मस्त झाला आहे. नामू परीट हि दाद घेवून जातो !
प्रसाद ओक , पुष्कर श्रोत्री  हि छोटेसे रोल छान करून जातात.  
पण सिनेमात सुसूत्रता जाणवली नाही... एखादी डॉक्यूमेंटरी म्हणावी एवढी हि सुसूत्रता ह्या दिग्दर्शकाला साधता आली नाही.

पार्श्व  संगीत हे फार वाईट  होते आणि भडक  होते ... तांत्रिक दृष्ट्या हे संगीत काही डायलॉग खाऊन टाकत होते. एकंदरीत संगीत हे लो बजेट आणि हौशी लोकांनी केले असावे असे वाटते. 

पुल प्रेमींच्या एकंदर अपेक्षा खूप असणे  साहजिक होते,  त्या अपेक्षा भंग होणे हे हि समजू शकतो ...पण हा  सिनेमा अपेक्षा भंग होण्या च्या पायरीवर हि पोहोचू शकला नाही असे मला वाटले.





Wednesday, February 8, 2012

खुशीची फकिरी



हि खुशीची फकिरी फार अजब असते ..हि न उतरणारीच भुतं ...

कोणाच्या जीवनाला चौकट मानवते .. कुणाचे जीवन रांगोळीच्या कणा सारखे विसकटण्यातच रमतं ...
रांगोळी चा  प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेवून पडतो. तशी हि माणस जिथे जातील तिथे आपला रंग टाकतात.
घरच्या चौकटीत, शिस्तशीर समाजाच्या चौकटीत त्या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना .. मग आपल्याशी जमणारा रंग शोधीत हिंडतात ... ह्या माणसांची कुळ निराळी  कुळाचार निराळे !
आवश्यक गरजा सुटत नाहीत ... कितीही चुकवायच्या म्हणल्या तरी जीवनाच्या चौकटी चुकत नाहीत ... म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते ! 

सभ्य संस्कृती समाजातल्या स्थानाची शिष्ठाचारांची कसलीही कुंपण त्यांना आड येत  नाहीत ..
मनाची कवाडं सताड उघडी टाकून हिंडणारी हि माणसं .. पहाणार्यांनी काय पहायचे ते सरळ पहावं डोकावून ..
भल्यांना लंगोटी आणि  नाठाळा ला काठी ! हाच अगदी साधा सूत्र मंत्र !
....
....

काही काही हस्तस्पर्शच असे असतात कि त्यांच्या हातात कण्हेर हि गुलाबा सारखी वाटते !

रावसाहेब ( पु ल ) मधून 

Monday, February 6, 2012

गोळा बेरीज



पुलं च्या साहित्या वर आधारित  " गोळा बेरीज " हा मराठी चित्रपट १० फेब ला येतो आहे .. आणि तो पहाण्या साठी मी अतिशय आतुर आहे... फर्स्ट डे फर्स्ट शो पहायला मिळाला तर उत्तम ..
ह्या सिनेमा बद्दल मिळालेल्या माहिती नुसार काही खटकलेल्या गोष्टी .. अजून सिनेमा बघितला नाहीये पण खालील व्यक्ती रेखा आणि त्या साकारणारे काही कलाकार आश्चर्य कारक वाटतात .


नंदा प्रधान : सुबोध भावे ... ( मला नेहमी सचिन खेडेकर हा नंदा प्रधाना सारखा वाटत आला आहे ) सुबोध भावे ला हा रोल का दिला हे माहित नाही ... सचिन खेडेकर  हाच खरा नंदा प्रधान !

हरी तात्या :    ( मला दामू अण्णा मालवणकर यांच्या सारखे हरितात्या वाटतात ) .... रोल कोणी केला आहे ते माहित नाही ... पण हरी तात्यांचे काऊस्टूम  जरा अधिक आणि  मौडर्न  वाटतात !    

पेस्तोंजी : सतीश शहा ( मला पेस्तोंजी हे बारीक आहेत असे वाटते .. सतीश शहा फार जाड आहे ह्या रोल साठी  पेस्तोन काका हे बारीक होते .. त्यांची बायडी हि त्यांच्या पेक्षा उंच होती ... त्याना एक ब्रिटीश वळण होते ) सतीश शहा हा नुसता गुजराती शेठ वाटतो ... पेस्तोन काका असे नाहीत !

रावसाहेब : कोणी केला आहे माहित नाही .. पण राव साहेब ग दि मां सारखे डोळ्या समोर उभे आहेत .. तांबूस गोरा वर्ण , उंचपुरे, कन्नडी वळणाचे धारदार बोलणे आणि वागणे !

अंतू बरवा ( माझं आवडतं व्यक्ती चित्र  ) :  दिलीप प्रभावळकर ठीक आहे पण    ... प्रसाद सावरकर हेच फक्त अंतू बरवा करू शकतात   असं माझं मत आहे

चितळे मास्तर : मोहन आगाशे  ...  मोहन आगाशे सारख्या क्रूर दिसणार्या माणसाला चितळे मास्तर बनवणे हि सर्वात मोठी चूक आहे असे मला वाटते ... बघू हा नाना फडणवीस काय करतोय ते !

गटणे :  दुष्यंत वाघ नावाच्या एका मुलाला हा रोल मिळाला आहे जो खूप आधुनिक  वाटतो आणि आमच्या गटण्या सारखा बिलकुल भासत नाही  ...  माझ्या डोळ्या समोरचा गटणे हा बुटका, गहूवर्णी , गोल चेहर्याचा  आहे ..

बबडू , गजा खोत , भय्या नागपूरकर  कोण करत आहेत माहित नाही पण त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे

पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांची कामे पाहण्यास उत्सुक आहे.



Thursday, February 2, 2012

निवडक रावसाहेब



एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.

आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

 बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 
हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !
    
काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..
रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?




निवडक हरितात्या



हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...
वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास  सनांच्या  गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...
हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !
प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते ?  हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही

माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..
पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...
एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पडलेल  पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..
या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा.

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..
चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला...... 




Wednesday, February 1, 2012

निवडक अंतू बरवा


रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात.  देवानी ...माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे , नारळा फणसाचे , खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.
जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..

विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !

कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील ....खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !

Tuesday, January 31, 2012

आज फिर जीने की तमन्ना हैं



कल के अंधेरों से निकल के, देखा हैं आँखे मलते मलते
फूल ही फूल जिन्दगी बहार हैं,
तय कर लिया

आज फिर जीने की तमन्ना हैं

काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल
कोई ना रोको दिल की उड़ान को,
दिल वो चला
आज फिर ...

डर हैं सफ़र में कही खो ना जाऊ मैं,
रास्ता नया

आज फिर जीने की तमन्ना हैं


शैलेंद्र

Sunday, January 29, 2012

काही बोलायाचे आहे



काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही


यशवंत देव

Saturday, January 28, 2012

वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि


‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषि रक्त
आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा’

कवी आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर ( ८ मार्च १९३० - २६ एप्रिल १९७६ ).
त्यांचे बालपण कुडाळ आणि बागलांची वाडी या निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत झाले. १९५९ साली ते मुंबईला आले. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा सर्वच साहित्यप्रकारांत लक्षवेधी लेखन केले. कवितालेखनासाठी त्यांनी ‘आरती प्रभू’ हे नाव घेतले.
आरती प्रभू हे नाव कसे घेतले याला पाश्र्वभूमी आहे. त्यांनी ‘प्रभू-खानोलकर’ या आडनावातील ‘प्रभू’ हे आडनाव घेतले. घरी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने हाक मारीत. त्या नावातील रोमन लिपीतील ‘आर’ आणि ‘टी’ ही अक्षरे त्यांनी घेतली आणि त्यातून ‘आरती प्रभू’ हे नाव तयार केले. 

कवी आरती प्रभू हे शालेय जीवनापासूनच कविता लिहीत. ‘बालार्क’ या शालेय हस्तलिखितात ‘पुष्पकुमार’ या नावाने त्यांनी काही कविता लिहिल्या. ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘शून्य शृंगारते’ ही त्यांची कविता ‘आरती प्रभू’ या नावाने प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘कोंडुरा’, ‘रात्र काळी घागर काळी’ या कादंबऱ्या मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक ‘रंगायन’ या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. १९६२ मध्ये त्यांचा ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘चानी’ ही त्यांची कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की व्ही. शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला. खानोलकरांनी ‘कालाय तस्मै नम:’ आणि ‘असाही एक अश्वत्थामा’ ही नाटकेही लिहिली.
काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगांवकर यांच्यासोबत काम केले. श्री. पु. भागवत, मंगेश  पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली.

१९७८ साली आरती प्रभूंच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही.
भावगीतांमध्ये ‘ती येते आणिक जाते..’, ‘ये रे घना, ये रे घना..’, ‘समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते..’ ही त्यांची गाणी अफाट लोकप्रिय झाली.  वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी ते गेले. (२६ एप्रिल १९७६)
मराठी विकी पृष्ठ  :

कविवर्य वसंत बापट यांच्या  शब्दात..

‘तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल अपुली अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कधीतरी पटदिशी..’ 
----------------------------------------------------------------------------------------


कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?


अंत झाला अस्ता आधी , जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे 


कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन 
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?


आरती प्रभू 
संगीत : भास्कर चंदावरकर 
स्वर : रवींद्र साठे 

Friday, January 27, 2012

उषःकाल होता होता



उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

सुरेश भट



Saturday, January 21, 2012

वांझ थय थयाट


उबदार घरट्यात 
आत्ममग्न चीव चिवाट
विद्वान दिवाण खान्यात 
वांझ थय थयाट 

अजून किती फसवणार आपण स्वतः लाच ?

{ अभिजित अत्रे ( अत्रे उवाच ) यांच्या कडून प्रेमानी ढापलेल्या चार ओळी  }






Thursday, January 19, 2012

संवेदना



आनंद झाला म्हणून असो किंवा वेदना, दुखः झालं म्हणून असो ... माणूस वेग-वेगळे आवाज काढून ते व्यक्त करतो ..  भावना व्यक्त करण्या साठी एक अत्यंत प्रभावी साधन आपल्याला मिळालेले आहे... शोकात बुडालेल्या एखाद्या व्यक्तीला म्हणूनच  मनसोक्त रडण्या करता प्रवृत्त करण्यात येते ... आज काल हास्य क्लब सुद्धा तसेच काही करतात .. भावनांना प्रभावी पणे वाट करून देण्या साठी "आवाज करणे " हा मार्ग आपण नकळत अवलंबतो. आपण ढोल वाजवून, संगीत वाद्य वाजवून आनंदाच्या भावना व्यक्त करतो.
लहान बाळ, कुत्र्या - मांजरी चे छोटे पिल्लू हि आपल्या भावना व्यक्त करण्या साठी वेग-वेगळे आवाज करते.

शब्दात व्यक्त न होऊ शकणार्या अनेक प्रकारच्या भावना शोधण्या साठी , विविध रस ( विरह , व्याकुळता , कारुण्य  इ ) जाणून घेण्या साठी , हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची सुरवात झाली असावी, बहुतेक असेच संगीत हि उत्पन्न झाले असावे.... 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात सर्व रस आहेत ( विभत्स व विनोद रस सोडून ). अनेक शास्त्रीय संगीतकार आपल्या गायना च्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती करून घेतात. हे  तंत्र बहुतेक स्वतः चा , स्वतः च्या भावनांचा शोध करून घेत ..पुढे त्या माध्यमातून अनंत ( unknown ) शोधण्यात उपयोगी असावे.
मला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत स्वतः च्या भावना शोधण्या साठी खूप उपयोगी वाटते  ( going from known to unknown), शब्दात न मांडता येणारे अनेक भाव केवळ स्वरांच्या माध्यमातून आपल्याला स्वतः ची ओळख करून देतात. 
उदाहरण देयचे झाले तर  दरबारी कानडा हा राग रोद्र रस , आर्जव व कारुण्य रस एकत्र उत्पन्न करणारा आहे आणि त्यातील अति कोमल गांधार हा स्वर हि गंभीरता उत्पन्न करतो .. हा अति कोमल गांधार स्वर गजेंद्र मोक्ष कथेतील , हत्तीच्या विव्हळण्यातून उत्पन्न झाला असे म्हणतात.

पुरिया धनाश्री चे असेच .. फक्त आलापी  सुद्धा प्रभावी पणे संध्याकाळची आर्तता, कारुण्य आणि विचित्र हवी हवीशी ओढ .. पटकन दाखवून जाते ... कोमल रिषभ आणि धैवाताची हि जादू आहे 

असेच तोडी रागाचे आहे ..सर्व  कोमल स्वर घेणार्या रागाचा अति कोमल रिषभ हा स्वर शांत वातावरण निर्माण करतो , मनाला शीतलता देतो ... 
मियां तानसेन दीपक राग  गाऊन झाल्यावर प्रचंड अस्वस्थ झाला , मनाचा तोल ( nervous  breakdown ) गेल्या मुळे.. फिरत फिरत दक्षिणे कडे आला.. तिथे गुजरी प्रांतात त्याला दोन गुजरी मुली पाणी भरत काही  गाताना ऐकू आल्या.. त्यांचे गायन  ऐकून  तानसेन चे मन शांत झाले .. परत तो स्वस्थ झाला , गाऊ लागला आणि उत्तरे कडे गेला ! हीच ती  गुजरी तोडी !
अशा अनेक आख्याईका आहेत ..  

एक मात्र खरं... तानसेन असो  वा कानसेन संगीताची संवेदना  सारखीच !