भयानक विध्वंसात ही नवनिर्माणाची चित्रं ज्यांना पाहता येतात तसंच खरं 'पहाणारे' , तेच द्रष्टे . ते कधी आपल्या गीतांतून , कधी कथांतून , कधी विचारांतून आणि त्याच्याशी सुसंबद्ध असणाऱ्या आचारातून समाजाला जीवनाकडे सौंदर्य लक्षी डोळ्यांनी पाहायला शिकवतात.
प्रलयानंतर हिरव्या पिंपळ पानावर पडून बालकाच्या कुतूहलानं पुन्हा हे जग पाहणारे हेच ते महात्मे . त्यांचे डोळे क्षणापुरते आपल्याला मिळाले तरीही वृक्षवल्लीतलं व्यक्तिमत्व दिसतं आणि लक्ष योजनां पलीकडून चमचमणार्या तारका , "आपल्याशी झिम्मा खेळायला या " म्हणून डोळे मिचकावून खुण्वायला लागतात . ज्ञानेश्वरांनी उगीचच अशा महात्म्यांना 'चेतना चिंतामणीचे गाव " म्हटलेलं नाही !
वयानं ऐंशीचा पल्ला गाठला तरीही शैशवातलं , ते कुतूहलानं भरलेले डोळे घेवून जगण्यातच रविंद्रनाथांचं मोठेपण होतं . गोचर किंवा अगोचर सृष्ठीतल्या अनुभूतींची त्यांची ओढ अखेर पर्यंत संपली नव्हती. मग ती अनुभूती कानी पडलेल्या एखाद्या नव्या सुरावली ची असो , झाडांच्या शेंड्याच्या वार्या- झुळकीबरोबर चालणाऱ्या नर्तनाची असो किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात लागलेल्या एखाद्या नव्या शोधाची असो. ऋतुचक्राच्या लीले पासून ते मानवी जीवनात चालणार्या इतर असंख्य लीलांकडे अशा कुतूहलाने पाहाणार्यांचाच नित्य नवा दिस जागृतीचा असतो . बाकीच्यांचं आपलं मागील पानावरून पुढे चालू ! त्यांच्या दिवसातला बदल कॅलेंडर वरची तारीख दाखवत असते . हातांना नव्या निर्मितीचा ध्यास नाही , डोळ्यांना नवं पाहण्याची हौस नाही . मनाला नवी मनं जोडण्याचा उत्साह नाही...
पण हे असंच चालायचं म्हणून भागत नाही . विशेषतः , ज्यांना निर्मितीचं देणं आहे , त्यांनी असं म्हणताच कामा नये . त्यांना "आनंदे भरीन तिन्ही लोक " हि प्रतिज्ञा करून जगावं लागतं.
पुलं च्या १९७७ मधील एका लेखा मधून ( पुरचुंडी )
No comments:
Post a Comment