Wednesday, April 18, 2012

मध्यमवर्गीय लेखक


मी माझ्या आयुष्यात  मला ज्या अनुभवांविषयी लिहावंसं वाटलं त्यांच्यावर लिहिलं. मी कारकुनी पेशा असलेल्या वातावरणात जन्माला आलो आणि वाढलो.  त्यासंबंधी मी लिहिलं. ह्यात मी काही गुन्हा वैगरे केला असं मला वाटत नाही. उलट , टूम म्हणून मला ज्ञात नसलेल्या कामगार जीवनावर लिहिण्याचा आव आणून आपण पुरोगामी असल्याची शेखी मिरवणं हा गुन्हा ठरला असता.
कारकून वर्ग हा तर माझा थटटे चा विषय. सतत तडजोडी करत जगणारी , टीचभर उंचीच्या महत्वाकांक्षा घेउन जगणारी , 'अब्रू' नामक गोष्टी बद्दल त्यांच्या ज्या काही कल्पना असतात त्यांना जपणारी , सुबकतेला  सौंदर्य मानणारी , असली जी माणसं मी पाहिली तीच माझ्या लेखनातून मी उभी करून त्यांची थटटा केली आहे. हे लोक काही मी समाजा  पुढे आदर्श म्हणून उभे केले नाहीत. त्यांच्याशी माझं वैर हि नाही.
माझा दृष्टीकोन 'मध्यमवर्गीय' आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही मला कुठल्या साचात बसवू इच्छिता ते मला कळत नाही . मी कारकुनी पेशाने जगणाऱ्या कुटुंबात वाढलो. हिंदुधर्मात ज्याला उच्च जाती असं खोट्या अहंकारानं म्हणतात तसल्या जातीत माझा जन्म होऊन शाळकरी वयात त्या जातीचे थोडेफार संस्कार झाले. ती नाती मी केव्हाच तोडली आहेत . देवपूजा , धार्मिक संस्कार , श्राद्ध पक्ष  वैगरे कार्म कांडांशी माझा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात संबंध आला नाही. त्यामुळे बर्या वाईटाला धार्मिक किंवा रूढीने ठरव लेल्या  तराजूने  मी कधीच तोललं नाही. तरी मी तुमच्या दृष्टीने मध्यमवर्गीयच असलो तर मग त्याला माझा इलाज नाही. माझ्या  लेखनात शहरात कारकुनी पेशानं जगणाऱ्या लोकांविषयीचेच उल्लेख अधिक असल्यामुळे मला आपण मध्यमवर्गीय म्हणत असाल , तर ईसाप नीतीला  'पशुवर्गीय ' साहित्य म्हणायला हरकत नाही !

(पु लं नी सुधीर बेडेकर यांच्या प्रश्ना ला दिलेल्या उत्तरातून - पुरचुंडी )

No comments: