Wednesday, June 12, 2013

आज पुलं चा स्मृतीदिन
१२ जून हा पुलं चा स्मृतीदिन .. आज त्यांना जाऊन १३ वर्ष झाली.. ते खरं म्हणजे विस्मृतीत गेलेच नाहीत .. दररोज त्यांचं एक तरी वाक्य कुठल्या नं कुठल्या प्रसंगा वरून आठवतं .. व्यक्ती आणि वल्ली तर अजून हि भेटतात ! त्यांचा आवाज "हरितात्या", "राव साहेबां" सारखाच ऐकू येतो..सतत मराठी मना मध्ये घुमत रहातो !
मी मराठी साहित्या कडे मनापासुन वळलो ते बहुतेक पुलं च्या कथाकथना च्या कॅसेटस्  मुळे ..आपल्याला जे आसपास दिसतंय ते हा माणूस बरोब्बर शब्दात मांडतोय हे अगदी सामान्य वाचका च्या लक्षात येतं ..त्यामुळे एक प्रकारचा संवाद लवकर साधला जातो ..त्याच्या प्रतिकात्मक,रुपात्मक, तुलनात्मक  शैलीत लिहिण्याची लकब हि जवळीक निर्माण करणारी होती (Comparisons using day to day analogies ..taking the reader from known to unknown ) बहुतेक म्हणूनच माझी  भाषे शी जवळीक निर्माण झाली असावी.. मला गदिमा हे मराठीचे मार्क ट्वेन वाटतात .. तसं  पुलं च्या बाबतीत नाही .. ते वेगळे आहेत.
त्यांना "मध्यम वर्गीयांचा " लेखक असं म्हणायचे तेच बरोबर. मध्यमवर्गीय आवडी-निवडीं ची नस त्यांनी त्यांच्या लेखनात पकडलेली दिसते .. म्हणूनच ६०-७०-८० च्या दशकात तेव्हाचा  पुणे-मुंबई तील मध्यम वर्गीय हा त्यांचा "core" वाचक वर्ग होता. आज सुद्धा पुलं च्या साहित्य-कथा कथनाचा स्पर्श झाला कि मराठी तरुण, परत मराठी साहित्य -पुस्तकं वाचण्या कडे आकर्षित होत आहेत !

मला जे आज १२ जून २०१३ ला लिहावसं वाटत होतं ते  "उत्पल वी बी " यांनी अधिक सुरेख शब्दात मांडलं आहे ! त्यांच्या लेखातील निवडक काही उतारे साभार :

------

पु .ल.देशपांडे हे माझ्यासाठी एक प्रकरण होतं. 'होतं' असं चटकन लिहिलं गेलं कारण आज आता गाडीने ते स्टेशन सोडलं आहे. त्याचा मला त्रास वगैरे होत नाही. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमचं विचारविश्व वेगवेगळे आकार घेत असतं. किंबहुना तसे आकार घेतले जाणं आणि त्यानुरूप तुमच्या वाचनात बदल होणं ही एक आश्वासक गोष्ट आहे. वाचन आपल्या आवडत्या टूथपेस्टसारखं नसावंच. अनेक वर्षं एकच ब्रँड! पण पुलंच्या बाबतीत मुक्काम लांबला हे मान्य करावं लागेल. पुलप्रभाव अनेक वर्षं टिकून होता. पुलं ज्यांना पाठ असतात अशा काहींपैकी मी एक. आणि पुलंनी दर्जेदार विनोदाचा आणि सभ्यतेचा जो संस्कार केला तो माझ्यावरही झाला.
साहित्य असं घनगंभीर नाव असलेल्या प्रकाराचं महत्त्व काय? त्याचं श्रेष्ठत्व कसं ओळखायचं? चांगलं साहित्य हे आपल्याला जीवनदर्शन घडवणारं असतं, तो त्याच्या श्रेष्ठतेचा एक निकष आहे असं म्हटलं जातं. उत्तम लेखन आपली खोलवर चौकशी करतं. (शब्दप्रयोगाची प्रेरणा पु.ल.देशपांडे. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे.…'माझे खाद्यजीवन', हसवणूक.) चांगलं लेखन प्रामाणिक असतं. अभिनिवेशरहित असतं. अंतर्मुख करणारं असतं. मग आपण हसतो तेव्हा काय होत असतं? आपण कशामुळे हसतो? तिथेही काही दर्शन घडत असतं का? की आपण अंतर्मुख होतो तेव्हाच फक्त दर्शन घडत असतं?
एक मात्र अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. भाबड्या पिढीवरील पुलप्रभावामुळे लघुनियतकालिकांची चळवळ, साहित्यातील इतर प्रवाह काहीसे दुर्लक्षित राहिले. नेमाडेंनी तर 'आपल्याकडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे भयंकर प्रकरण आहे ना….'असा उल्लेख कुठेतरी केल्याचं स्मरतं. त्याचा राग यायचं खरंच काही कारण नाही. पुलंची मोहिनी इतकी जबरदस्त होती की अनेक चांगले लेखक मराठी वाचकांच्या नजरेतून सुटले किंवा उशीराने लक्षात आले हे खरं आहे. पुलंची लोकप्रियता नक्की कशामुळे होती? मार्मिक, सर्वसामान्य (म्हणजे शहरी, निमशहरी मराठी मध्यमवर्गीय) माणसाला जवळचं वाटणारं, बुद्धिमान निरीक्षण आणि बेतोड विनोदाची डूब असलेलं, सात्विक विचार असलेलं, विद्वत्तेचा आव अजिबात न आणणारं, जुन्यात रमणारं, मूल्यांची पीछेहाट होताना बघून तळमळणारं - एका सामान्य स्थानावरून भोवतालचा गोंगाट टिपणारं पुलंचं लेखन बहुतेकांना आवडत होतं. माझ्यासारखा अत्यंत टिपिकल मध्यमवर्गीय घरातला मुलगाही त्याला अपवाद नव्हता. पुलंची दृष्टी अतिशय स्वच्छ वाटायची. आणि अर्थातच त्यांचा विनोद आणि उत्तम भंकस करायची ताकद त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित करायची!
मराठी अवघड करण्याबाबत पु.ल.तीव्र नाराजी व्यक्त करीत. त्याबद्दल ते एका ठिकाणी म्हणतात, ज्या रेडियोने लोकांच्या बोलण्यातल्या भाषेची विशेष काळजी घेतली पाहिजे तिथे तर साराच आनंद आहे. रेडियोवरच्या मराठीतून दिलेल्या बातमीवर अमूक अमूक वृत्त पोलीस सूत्रांनी दिलं, असं जेव्हा ऐकलं तेव्हा ‘पोलीससूत्र’ हे काय प्रकरण आहे ते मला कळेना. आता कळलं, ‘सूत्र’ हे इंग्रजी सोर्सचं भाषांतर. पोलीस कचेरीतून ही माहिती कळाली असं सांगितलं असतं तर काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता जर बायकोकडून बातमी कळाली तर ती मंगळसूत्राकडून कळाली असं म्हणायचं का?
----------------

 संपूर्ण लेख "एका लेखकाने"  इथे आहे :