Monday, April 30, 2012

कट्टा संस्कृती-तरुणाई


'युवा पीढी ' अशी घाऊक कल्पना मनात बाळगून तिच्यावर बरेवाईट शेरे मारणं मला योग्य वाटत नाही . तारुण्य हा समान घटक धरला तरी प्रत्येक तरुण एकाच साच्यातला गणपती नव्हे. तरीही मनाचा मोकळेपणा , साहसाची हौस , तरुण तरुणींना परस्परांविषयी वाटणारं आकर्षण , फार शिस्त लावू पाहणार्या मंडळी विषयी थोडीफार भीती , थोडाफार तिटकारा हि प्रतिक्रिया सनातन आहे. कॉलेजात असताना पुण्यातल्या "गुडलक" मध्ये  आमचा अड्डा जमत असे.  आताची पीढी "वैशाली" त जमते . प्राध्यापकां पासून ते बोल घेवड्या देशभक्तां पर्यंत  आणि लेखाकांपासून ते एखाद्या शामळू सिनेमा नटा पर्यंत सर्वांची टिंगल टवाळी चालायची , नकळत व्ह्यायची , चांगल्या  आणि फालतू विनोदांची , पाचकळ शाब्दिक कोट्यांची फैर झडायची. त्यामुळे कट्टासंकृती पाहिली कि एक सुदृढ परंपरा आजतागायत चालू असल्याचा मला आनंद वाटतो. तत्कालीन पेंशनरांना उनाड वाटणार्या त्यातल्या कित्यक तरुणांनी बेचाळीस च्या चळवळीत  स्वतः ला झोकून दिलं होतं . ..तुरुंगवास सहन केले होते आणि तुरुंगात हि देशाचं  कसं होईल ह्याची चिंता करत न  बसता तिथंही कट्टा जमवला होता .
आजहि मला तरुण तरुणींची कट्टा -थट्टा रंगत आलेला  दिसला  , कि ती मंडळी माझ्या आप्तस्वकीयांसारखीच  वाटतात. आपण उच्चस्थानावर उभं राहून त्यांच्या त्या वागण्याची तपासणी करत रहावं असं न वाटता त्या कट्टे बाजान च्या  मैफिलीत हळूच जाऊन बसावं असंच  वाटतं. त्यामुळे त्यांचं ते मोकळेपणानं वागणं मला कधी खटकत नाही . पोशाखाच्या तर्हांची मला मजा वाटते. रस्त्यावरच्या भयंकर गर्दीत आपली स्कुटर चतुराईनं घुसवणार्या मुलीचं मला कौतुक वाटतं. मात्र अकारण उद्धटपणानं किंवा दुसऱ्या कुणाला ताप होईल असं वागणं हे मात्र मला खटकतं.
पुन्हा तरुण व्हायला मिळालं तर खूप आवडेल . डोंगरदर्यांतून मनसोक्त गीरीभ्रमणं करीन , मैदानी खेळात भाग घेईन. भरपूर पोहीन , चित्र काढीन. अशा अनेक गोष्टी  राहून गेल्या आहेत. त्या पूर्ण करायला मनाला शरीराची साथ मिळायला हवी . त्याबरोबरच त्या नवीन तरुण मनाला साजेल अशा जिद्दही नं  सामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प हाती घेवून तो पुरा करण्या मागं लागेन.

(पुलं , कॉलेज कट्टा , दिवाळी १९९६ )

Sunday, April 29, 2012

जे आनंद देईल ते आपलं !

जीवनात  काही भव्य दिव्य दिसलं तर त्यानं भारून जायचं, त्याचंच कौतुक करायचं आणि तुलनेनं जीवनातील वाईट आहे त्याकडे तितकसं  लक्ष द्यायचं  नाही , असा हा माझ्या स्वभावाचाच भाग आहे. म्हणजे मल्लिकार्जुन मन्सूर किंवा कुमार गांधारांचं गाणं ऐकून कि भारून जातो . या दोघान इतकच जर एखादी लहान मुलगी चांगली गायली तरीही मी भारून जाईन आणि या दोन्ही भारून जाण्यात गुणात्मक फरक काहीच नसतो . मला एकदम ते अपील होतं . मला अजूनही  हे समजलं नाही कि मला आमुक आवडलं नाही , हे सांगण्यासाठी पन्नास पानं का खर्च करावी ? मला जे आवडलेलं  आहे ते दुसर्याला सांगायचा मोह होतो . मला आवडलेल्या पुस्तकान बाबत मी जे काही लिहिलंय ते समीक्षेच्या स्वरुपाच नसून त्या लेखनाला दिलेली दाद अशा स्वरूपाचं आहे. समीक्षा करायची म्हटली कि काही म्हटलं तरी , त्यातले दोष दाखवण्याची जवाबदारी येते . त्याशिवाय समतोल साधला जात नाही असं समजलं जातं . मला आवडलं ते मी सांगणार. पुष्कळ लोकं म्हणतात, तुम्ही 'गुण गाईन आवडी ' चं करता . सद्गुण  तेवढे दाखवता. दुर्गुणांचं  काय ? आता दुर्गुणांच जे व्हायचय  ते होईल . दुर्गुण आणि तो मनुष्य ते बघून घेतील . मला त्याच्यात रस नाही.
माझ्या स्वभावात चिकित्सा  हा भाग नाही. स्वीकार हा भाग जास्त आहे. मला जे आनंद देईल ते आपलं वाटतं.

( पुलं च्या एका मुलाखातीतून ... )

Wednesday, April 25, 2012

गदिमा


एकनाथां प्रमाणे  माडगूळकर हा सर्व पेठांचा कवी . भागवता पासून भारुडा पर्यंत नानापरीन्च्या गीतांचा तो एक जसा जनक होता तसेच  माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी छुमछुमत असते.
देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो. एखादी नात आजीला गीत-रामायण एकवत असते. एखाद्या विजानात तरुतळी एक वहि कवितेची घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी युवती माडगूळकरांचे गीत गात असते; आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समर गीतांच्या धुंदीत पावले टाकत असतात. कवीच्या हयातीतच त्या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभले. माडगूळकरानच्या कढत लावणीचा चटका बसलेले एक गृहस्थ चिडून मला म्हणाले होते , कि " माडगूळकरांनी असल्या फक्त लावण्याच लिहाव्यात ! मी सांगतो , 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम ' सारखी एक ओळ माडगूळकरांना लिहिता येणार नाही . असल्या तेजस्वी कवी कडे जाऊन शिका म्हणावं ! "
"ते शक्य नाही , " मी म्हणालो
"का ?"
"कारण 'वेदमंत्राहून आम्हा ' हे गीत सुद्धा ग.दि माडगूळकरांचं च आहे ."

संत-शाहीरां नंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पहाण्यात नाही . सामान्य आणि असामान्य, दोन्ही प्रतींच्या रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कवी आहे.
कवी म्हणजे माडगूळकर हेच  समीकरण आहे. त्यांचे गीत-रामायण ऐकणाऱ्या श्रोत्यांना तर ह्या कवीला आणि गायक सुधीर फडक्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले आहे . त्यांना प्रतिसाद मिळतो तो 'पुंडलिका वरदा ' म्हटल्यावर हजारोंच्या मुखांतून ' हाऽऽरि विठ्ठऽऽल ' उमटतो तसा ! आईने दुधा बरोबर ओवी पाजून वाढवलेला हा कवी आहे . आता उमलतात ती त्या शुध्द देशी संस्काराची फुले.

( पुलं नी गदिमांच्या  गीतसौभद्र ह्या  गीतकाव्य - संग्रहाला(१९६८) लिहिलेल्या प्रस्तावनेतून साभार )

Saturday, April 21, 2012

उन्हाळ्यातली पेय भ्रमंती

ह्या आधीची खाद्य भ्रमंती .. इथे  इथे  इथे आणि इथे  पहा

उन्हाळ्यात सर्वांची आवडती "सखी " म्हणजे  "मस्तानी" ... हिचं  नाव लहान मोठ्यांच्या मनात येतं  ते तिच्या गोडव्या मुळे ... घट्ट मिल्क शेक वर तरंगणारया आईस्क्रीम गोळ्या च्या थंडाव्या  मुळे आणि त्या नंतर पोटात मिळणार्या शांतते मुळे ! प्रत्येक गावात आईस्क्रीम / मस्तानी खाण्या साठी एक विशेष ठिकाण नक्की आहे .. असतं... भारतात कुठे हि जा... अगदी विदर्भातल्या रण-रणत्या गावापासून ते खालच्या कोकणातल्या एखाद्या लहानशा बाजारा च्या ठिकाणा पर्यंत ..
पुण्याचं  हि असंच "मस्तानी" शी नातं आहे.
खरं तर पुण्यात पहिली "मस्तानी" सुरु केली ती खजिना विहिरी जवळच्या- स्काउट ग्राउंड समोरील  बुवा आईस्क्रीम  वाल्यांनी ...तेव्हाची मस्तानी हि खर्या दुधात पिस्ता, चोकोलेट , अंबा किंवा गुलकंद सेंट घातलेलं दुध  .. त्या वर .. पॉट मध्ये तयार केलेल्या मलईदार आईस्क्रीम चा गोळा ...एका मोठ्या ग्लास मध्ये मोठा उंच चमचा घालून मिळत असे .. ( पुढे  काही लोकं ह्या चमच्याला "अमिताभ" म्हणत )
पुढे कावरे कोल्ड्रिंक्स  (गणपती चौक आणि तुळशीबाग ) आणि इतर आईस्क्रीम वाल्यांनी हि मस्तानी विकायला सुरवात केली ... लहानपणी मी पेयलेल्या  मस्तानी तील  मिल्कशेक (आताच्या मनाने ) पातळ असायचा ... तो पिता येयचा. आजकाल तो बराच "पिठूळ लेला " , घट्ट असतो ..पिता येत नाही .. खावा लागतो ! ( बहुतेक पावडर च्या दुधा मुळे असेल )
आताचे आघाडीचे 'मस्तानी वाले " म्हणजे  कोन्ढाळकर (ओरीजिनल घट्ट मस्तानी बनवणारे) , सुजाता मस्तानी ( हे पण कोन्ढाळकरान पैकीच ) ... सुजाता मस्तानी च्या आता पुण्यात अनेक ठिकाणी शाखा सुरु झाल्या आहेत . ह्यांची सुरवातिची दुकानं निंबाळकर तालीम चौकात अजून हि चालू आहेत.
अमृत कोकम हे अनेक ठिकाणी प्यायला मिळते ..पण "गणू शिंदे" यांचे स्पेशल अमृत कोकम हे एक विशेष चवदार पेय आहे.... पूर्वी स्पेशल अमृत कोकम मध्ये लिम्का असायचा आता त्या ऐवेजी लेमन किंवा लेमोनेड घालतात ...लक्ष्मी रोड वरील ट्राफिक सहन करत गणू शिंदे कोल्ड्रिंक हाउस मध्ये केवळ "स्पेशल अमृत कोकम " पिण्या साठी जावं ! तिथे गेलात तर " थंडाई " चा एखादा ग्लास हि घेयला विसरू नका !
उन्हाळयात  मला अत्यंत आवडणार्या गोष्टी मध्ये "बर्फाचा  रंग बिरंगी गोळा" हे आहे .. तसं  "गोळावाले" आजकाल कमीच दिसतात .. पण तो गोळा बनवताना .. बर्फाच्या लादीतून बर्फाचा किस काढताना ... तो लहान मोठ्या ग्लासातून घट्ट बसवताना .. काडी रोवताना .. त्यावर रंग ओतताना  बघण्यात एक अजब मजा आहे... हैदराबाद हे शहर मला आजिबात आवडलं नाहिये पण  तिथे पानांच्या दुकानात मिळणारे "आईस गोळे " हि एकमेव आवडलेली गोष्ट !
उन्हाळयातील बाकी पेयान मध्ये .. कलिंगडाचा रस - वर छोटे काप , कैरीचे गुळातले थंडगार पन्हं ,  करवंदाचे सरबत , वाळा सरबत, उसाचा थंडगार रस, थंडगार नीरा ...    हे नुसते आठवले तरी सुद्धा मनाला एक प्रकारची उल्हासित करणारी शीतलता मिळते ह्यात  काही नवल नाही !

सकाळी नीरा ....दुपारी लिंबू सरबत , कलिंगड रस -काप  , वाळा सरबत .. अमृत कोकम  ... संध्याकाळी चटकदार भेळ - पाणीपुरी ..भेळ तिखट लागल्या मुळे एकदोन ग्लास उसाचा रस ... रात्री अंबा-पिस्ता मस्तानी ... अजून काय हवं उन्हाळा आवडायला ?

Wednesday, April 18, 2012

मध्यमवर्गीय लेखक


मी माझ्या आयुष्यात  मला ज्या अनुभवांविषयी लिहावंसं वाटलं त्यांच्यावर लिहिलं. मी कारकुनी पेशा असलेल्या वातावरणात जन्माला आलो आणि वाढलो.  त्यासंबंधी मी लिहिलं. ह्यात मी काही गुन्हा वैगरे केला असं मला वाटत नाही. उलट , टूम म्हणून मला ज्ञात नसलेल्या कामगार जीवनावर लिहिण्याचा आव आणून आपण पुरोगामी असल्याची शेखी मिरवणं हा गुन्हा ठरला असता.
कारकून वर्ग हा तर माझा थटटे चा विषय. सतत तडजोडी करत जगणारी , टीचभर उंचीच्या महत्वाकांक्षा घेउन जगणारी , 'अब्रू' नामक गोष्टी बद्दल त्यांच्या ज्या काही कल्पना असतात त्यांना जपणारी , सुबकतेला  सौंदर्य मानणारी , असली जी माणसं मी पाहिली तीच माझ्या लेखनातून मी उभी करून त्यांची थटटा केली आहे. हे लोक काही मी समाजा  पुढे आदर्श म्हणून उभे केले नाहीत. त्यांच्याशी माझं वैर हि नाही.
माझा दृष्टीकोन 'मध्यमवर्गीय' आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही मला कुठल्या साचात बसवू इच्छिता ते मला कळत नाही . मी कारकुनी पेशाने जगणाऱ्या कुटुंबात वाढलो. हिंदुधर्मात ज्याला उच्च जाती असं खोट्या अहंकारानं म्हणतात तसल्या जातीत माझा जन्म होऊन शाळकरी वयात त्या जातीचे थोडेफार संस्कार झाले. ती नाती मी केव्हाच तोडली आहेत . देवपूजा , धार्मिक संस्कार , श्राद्ध पक्ष  वैगरे कार्म कांडांशी माझा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात संबंध आला नाही. त्यामुळे बर्या वाईटाला धार्मिक किंवा रूढीने ठरव लेल्या  तराजूने  मी कधीच तोललं नाही. तरी मी तुमच्या दृष्टीने मध्यमवर्गीयच असलो तर मग त्याला माझा इलाज नाही. माझ्या  लेखनात शहरात कारकुनी पेशानं जगणाऱ्या लोकांविषयीचेच उल्लेख अधिक असल्यामुळे मला आपण मध्यमवर्गीय म्हणत असाल , तर ईसाप नीतीला  'पशुवर्गीय ' साहित्य म्हणायला हरकत नाही !

(पु लं नी सुधीर बेडेकर यांच्या प्रश्ना ला दिलेल्या उत्तरातून - पुरचुंडी )

Monday, April 16, 2012

प्रलयातील पिंपळ पाने ...


भयानक विध्वंसात ही नवनिर्माणाची चित्रं ज्यांना पाहता येतात तसंच खरं 'पहाणारे' , तेच द्रष्टे . ते कधी आपल्या गीतांतून , कधी कथांतून , कधी विचारांतून आणि त्याच्याशी सुसंबद्ध असणाऱ्या आचारातून समाजाला जीवनाकडे सौंदर्य लक्षी डोळ्यांनी पाहायला शिकवतात.
प्रलयानंतर हिरव्या पिंपळ पानावर पडून बालकाच्या कुतूहलानं पुन्हा हे जग पाहणारे हेच ते महात्मे . त्यांचे डोळे क्षणापुरते आपल्याला मिळाले तरीही वृक्षवल्लीतलं व्यक्तिमत्व दिसतं आणि लक्ष योजनां पलीकडून चमचमणार्या तारका , "आपल्याशी झिम्मा खेळायला या " म्हणून डोळे मिचकावून खुण्वायला लागतात . ज्ञानेश्वरांनी उगीचच अशा महात्म्यांना 'चेतना चिंतामणीचे  गाव " म्हटलेलं नाही !
वयानं ऐंशीचा पल्ला गाठला तरीही शैशवातलं , ते कुतूहलानं भरलेले डोळे घेवून जगण्यातच रविंद्रनाथांचं मोठेपण होतं . गोचर किंवा अगोचर सृष्ठीतल्या अनुभूतींची त्यांची ओढ अखेर पर्यंत  संपली नव्हती. मग ती अनुभूती कानी पडलेल्या एखाद्या नव्या सुरावली ची  असो , झाडांच्या शेंड्याच्या वार्या- झुळकीबरोबर चालणाऱ्या नर्तनाची असो किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात लागलेल्या एखाद्या नव्या शोधाची असो. ऋतुचक्राच्या लीले पासून ते मानवी जीवनात चालणार्या इतर असंख्य लीलांकडे अशा कुतूहलाने पाहाणार्यांचाच  नित्य नवा दिस जागृतीचा असतो . बाकीच्यांचं आपलं मागील पानावरून पुढे चालू ! त्यांच्या दिवसातला बदल कॅलेंडर वरची तारीख दाखवत असते . हातांना नव्या निर्मितीचा ध्यास नाही , डोळ्यांना नवं पाहण्याची हौस नाही . मनाला नवी मनं जोडण्याचा उत्साह नाही...
पण हे असंच चालायचं म्हणून भागत नाही . विशेषतः , ज्यांना निर्मितीचं देणं आहे , त्यांनी असं म्हणताच कामा नये . त्यांना "आनंदे भरीन तिन्ही लोक " हि प्रतिज्ञा करून जगावं लागतं.

पुलं च्या १९७७ मधील एका लेखा मधून   ( पुरचुंडी ) 

Saturday, April 14, 2012

उन्हाळ्यातील पुस्तक रवंथी


ह्या उन्हाळ्यात वाचलेली ... काही परत वाचलेली पुस्तके !

 कविता संग्रह 

१) मौनाची भाषांतरे : संदीप खरे
पुस्तकाचा गेटअप एखाद्या वहि सारखा .. आवडलं
२) नक्षत्रांचे देणे :  चि त्र्यं  खानोलकर
एव्हर ग्रीन ..
३) पक्षांचे ठसे : सुधीर मोघे
छोटं पण मस्त....
४) विविध कवींच्या १०० निवडक कविता ( निवड कर्ता : कुसुमाग्रज )
संग्रहाय ..
५) शिंग फुंकिले रणी : वसंत बापट
जबरदस्त ....
६) जिप्सी : मंगेश पाडगावकर
सदाबहार ....
७) मीरा : पाडगावकर
८) कबीर : पाडगावकर
९) सुरदास  : पाडगावकर

गद्य 

१) पुरचुंडी : पु ल देशपांडे
२) दाद  : पु ल देशपांडे
३) रेडियो वरील भाषणे आणि श्रुतिका ( भाग १ व २): पु ल देशपांडे
४) व्यक्ती आणि वल्ली : पु ल देशपांडे
५) असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार : अ द मराठे
६) सार्थ भारुडे  : व्यंकटेश कामतकर
७) नादवेध : अच्युत गोडबोले / सुलभा  पिशवीकर
८) अनुबंध : सुधीर मोघे



Friday, April 13, 2012

भोंदुगिरी म्हणावी का वेडेपणा ?



स्वामी आणि महाराज , बाबा लोकांचा सुकाळ चालू आहे.... वेड्या सारखे लोकं यांच्या मागे धावतात ..
कोणाच्या "अंगात " येते आणि ते काही बडबडतात .. त्यातून त्यांचे "भक्त" लोकं काही अर्थ काढून लोकांना सांगतात आणि स्वतः चा खिसा भरून घेतात ... काही शोषण हि करतात ... हे आधुनिक भारतात २१ व्या शतकात चालू आहे ...
गोर -गरीब -अशिक्षित  लोकं हे पूर्वी पासूनच ह्या वेडेपणाला बळी पडत आहेत.. त्यात भर आता "शिक्षित " लोकांची ...कॉम्प्युटर आणि आयटी हि आधुनिकता फक्त नावाला ... भारतीय संस्कृती च्या नावाखाली आयटी वाले लोकच असल्या थेरा पुढे बळी पडताहेत  हे गमतीचे वाटते ...
श्री श्री हा प्रकार पाहिला कि आयटी वाल्या लोकां बद्दल चा सर्व अभिमान गळून पडतो .. श्री श्री हे मुख्यतः आयटी वाले गुरु मानले जातात ... असे अनेक "आयटी" वाले गुरु, दक्षिण भारतात आहेत !
बंगलोर -हैद्राबाद - चेन्नई वैगरे भागात असे अनेक "गुरु -स्वामी - महाराज " आप- आपले आश्रम थाटून बसले आहेत ... आता त्यांच्या "भक्त" लोकांना काय म्हणावं हे कळत नाही .. हे लोकं भक्तान वर काय अशी भुरळ पाडतात हे समजत नाही ... असो . काही वर्षान पूर्वी "नित्यानंद" महाराजाची "कृत्ये" बाहेर आली आहेतच !!
अगदी अमिताभ बच्चन ते सचिन तेंडूलकर असल्या बाबा -स्वामी लोकांना इंडोरस्मेंट करतात   हे आश्चर्य वाटते ! युवराज सिंग ची  आई असल्याच एका "निर्मल बाबा " वर २० लाख रुपये खर्च करून त्याच्या कँसर चा इलाज करून घेत होती !!
भारतीय लोकांचा भोळे-भाबडे पणा का मुर्ख पणा हे समजणं अवघड आहे ... भारतीय संस्कृती च्या नावाने काय वाट्टेल ते चालू आहे हे मात्र खरं. भोळेपणा .... भाबडेपणा ... असुरक्षितता ... कुठे घ्या विषाची परीक्षा ... सगळे करताहेत नमस्कार आपण हि करुया.... हि असली सगळी कारणे देत लोकं स्वामी , बाबा ..महाराज ..असल्या लोकांच्या नादि लागतात .... "सोशल प्रेशर " असे हि म्हणता येईल कदाचित ...
ह्या गोष्टी ला कोणीही अपवाद नाही ... दिल्लीवाले ..नॉर्थ वाले .. साउथ वाले ...मद्रास वाले ..बंगाली .. गुजराती .. मराठी ... अजून कुठल्या भारतातल्या प्रांतातले ...सगळ्यांचे आप-आपले "स्वामी - गुरु - महाराज " ... सगळे ह्या "आंधळ्या - भक्ती " ला लाचारीने स्वीकारत आहेत .. काही तर गर्वाने मिरवीत आहेत !
एक गोष्ट चांगली आहे कि आता हा भोंदूपणा बाहेर तरी आला आहे ... त्यामुळे नवी पीढी जरा तरी विचार करून असल्या "मार्गा" ला लागेल अशी आशा आहे !




   

Saturday, April 7, 2012

ताऱ्यांचे बेट : वेगळ्या वळणाचा अवाक करणारा अनुभव



२०११ एप्रिल मध्ये प्रकाशित झालेला "ताऱ्यांचे  बेट" हा सिनेमा अचानक आज बघायला मिळाला ! एकदम खिळवून ठेवणारी कथा आणि कथानक ... डीव्हीडी बघायला सुरवात केली आणि सिनेमा संपे पर्यंत भान हरपले. सिनेमा अंतर्मुख करणारा .. विचार करायला लावणारा ..
साधेपणा , निरागसतां , भाबडेपण .. एकदम काळजाला शिवणारं ....
मजबूत पण साध्या वळणाची पटकथा ( सौरभ भावे )  , साजेसं दिग्दर्शन ( किरण यज्ञोपवीत ) हे किती प्रभावीपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतं हे ह्या सिनेमा मुळे जाणवलं. मला ह्या सिनेमातील "सॉफ्ट" संगीत (नंदू घाणेकर/ नरेंद्र भिडे ) आणि सिनेमेटोग्राफी (सुधीर पळसाने) हि आवडली.
एखादं पुस्क्तक जसं एकहाती वाचून संपवतात तसा मी हा सिनेमा डीव्हीडी टाकल्या पासून खुर्ची वर खीळवलेल्या अवस्थेत जवळ जवळ अचाट होवून , मध्यंतर न घेता पाहिला.... थेटरात नाही पाहिला हे एका दृष्टीने बरच झालं .... पाणावलेले डोळे आणी एक प्रकारची सुन्नता , विचार करायला लावणारी शांतता ह्या मुळे पुढचे एक-दोन तास  मी अवाक होवून एकांतात घालवले .. सिनेमा नी मला पुरता विळख्यात बांधून ठेवलं होतं !
कास्टिंग करतानाच दिग्दर्शकाची प्रतिभा जाणवली ... कलाकारांनी तर कमालच केली आहे...साधी सुटसुटीत ऍकटींग ..सिनेमा ला एका वरच्या स्तरावर घेवून जाते ..
ह्या सिनेमाची प्रोड्युसर " हिंदी सिरीयल वाली " एकता कपूर आहे हे समजल्या वर एक सुखद धक्का बसला.
सचिन खेडेकर नी अप्रतिम काम केलं आहे ... जोडीला अश्विनी गिरी आणि अस्मिता जोगळेकर त्यांच्या रोल मध्ये एकदम "फिट्ट" बसल्या आहेत !
ओमकार च्या रोल मधला इशान तांबे चा  सहज-सुलभ अभिनय एकदम आवडून जातो ... कुठे तरी आपल्या बालपणा ची आठवण करून देतो ...
तीन सीन्स-सिक्वेन्सेस  मला एकदम आवडले : आई नी ओमकार ला मारलेली थप्पड , वार्षिक परीक्षे चा सिक्वेन्स आणी गणपती मंदिरातील सिक्वेन्सेस !
सिनेमात कुठेही बट - बटीत पणा नाही ..साधी सरळ कथानक ..खिळवून ठेवणारी कथा , काळजाला भिडणारी ... चटका लावून जाणारी पेशकारी .. अजून काय हवं सिनेमात ? "अजून थोडा वेळ सिनेमा हवा होता  शेवट एकदम पटकन झाला" असं प्रेक्षकाला वाटतं हिच ह्या सिनेमा च्या यशाची ची पावती  आहे !
मला "ताऱ्यांचे बेट " प्रचंड आवडला !




Tuesday, April 3, 2012

पटली पाहिजे अंतरीची खूण


नुसत्या स्वरांच्या आर्तते मुळे ..एखादं गाणं पटकन आपल्या डोळ्यात पाणी आणतं ... ह्यात स्वरांचा  , संगीताचा, शब्दांचा ,कलाकारांच्या प्रतिभेचा  का ऐकणाऱ्याच्या भावनिक सर्जनशिलतेचा भाग आहे  हे समजणं कठीण आहे ...असो ! झटकन डोळे पाणावतील.. म्हणून गाणं ऐकण्या पूर्वीच काळजी घ्या!

गीत : आचार्य अत्रे , संगीत : वसंत देसाई , स्वर : आशा भोसले ,अभिनेत्री :वनमाला , ह्या सर्वांना त्रिवार सलाम !


भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण


सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
कळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती जी खरी ती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी....भरजरी ग ...




चित्रपट : श्यामची आई (१९५३)


हेच गाणं एका छोट्याशा मुलीने फार छान म्हटले आहे ! तिने घेतलेल्या "जागा" आणि तिचा गोड आवाज ..एकदम मस्त !


ह्या  छोट्या मुली ( अन्वी ) ला अनेक शुभेच्छा !


Monday, April 2, 2012

भैरव ते भैरवी : एक सुंदर कार्यक्रम


आज पं विजय कोपरकर यांचा भैरव ते भैरवी हा अप्रतिम  कार्यक्रम पाहण्याचा योग आला ! ह्या कार्यक्रमात न आवडण्या सारखं काहीच नाही ! संकल्पना , कलाकार , पेशकश , निवेदन सगळच अतिशय उच्च स्तरावरचं वाटलं. सर्व  कलाकार गुणी, प्रतिभावंत  आणि अभ्यासी वृत्तीचे जाणवतात ,संयोजन एकदम सूत्रबद्ध असं ( मिलिंद ओक , डॉ समीर कुलकर्णी , आशिष मुजुमदार ) , वादक कलाकार आणि गायक हे पूर्ण तयारी चे असे , स्वतः पंडित कोपरकर हे केवळ तीन -चार मिनटात एखादा राग पूर्ण पणे मांडतात आणि  प्रेक्षक मंत्रमुग्ध होवून जातात ... राहुल सोलापूरकर आणि पौर्णिमा मनोहर ह्यांचं निवेदन म्हणजे दुग्ध-शर्करा योग ... वादकांची मोजकी आणि सुरेख साथ हे सगळं सुरेख जमून आलं आहे . पं कोपरकरांची प्रतिभा आणि ज्ञान हे कार्यक्रमाच्या  प्रत्येक क्षणा ला जाणवते..
तीन तास पटकन गेले असं वाटतं .... हा कार्यक्रम ५ तासांचा केला तरी प्रेक्षकांना तो आवडेल ..
आजचा  कार्यक्रम  कवी ग्रेस यांना समर्पित होता .. सर्व गुणी आणि प्रतिभावंत कलाकार एकत्र आले कि काय अप्रतिम पेशकश होऊ शकते हे भैरव ते भैरवी हा कार्यक्रम बघितल्या शिवाय कळणार नाही ...
साहित्य , कला , संगीत  ह्या विषयी कण भर जरी रस असेल तर हा कार्यक्रम जरूर बघावा ...
दत्त प्रसाद रानडे  आणि  सायली पानसे हे गायक आपल्या उपशास्त्रीय गायनानी  पं कोपरकरांना पोषक साथ करतात ...आणि टाळ्या हि घेवून जातात .... तबला (प्रसाद जोशी )  , वायोलीन्स  (राजेंद्र भावे )  , ताल वाद्य , सिंथ (केदार परांजपे ) वाजवणारे कलाकार  सुरेख साथ देतात आणि दाद घेवून जातात ..

मी  ह्या कार्यक्रमाला  ए - वन ग्रेड दिली आहे आणि  फॅन झालो आहे ! "प्रत्येकाने जरूर पहावा असा कार्यक्रम" म्हणून मी शिफारस करीन ! संगीत तुम्हाला अज्जिबात कळत नसेल किंवा फार कळतं असं वाटत असेल तरी हा कार्यक्रम तुम्हाला खूप काही शिकवून जाईल .. आनंदित करेल ..आवडेल !
पुण्यात जेव्हा - जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा मी नक्की पाहीन हे नक्की !
आज राम नवमी ला संगीताचे दोन अप्रतिम कार्यक्रमांची  भेट मिळाली : भैरव ते भैरवी (५ ते ८) आणि नंतर हृदयनाथ चा भावसरगम (८ ते १० )