Monday, February 20, 2012

अहंकाराचा पहारेकरी



कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम प्रथम संवाद करावासा वाटतंच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवत की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वताचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते ह्याचा अर्थच काय? 

वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणिवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एके काळी मैत्री झाली होती ती कारणे, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ, आमंत्रण देत राहतो, पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करत राहतो.

त्या कोण्या एका व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कस? हा एकमेव प्रश्न, अहंकार विचारत राहतो. मग अट्टाहासाने वैर जोपासले जाते. अट्टाहासाने संगोपन केलेले वैर जास्त थकवते. ही सहनशक्तीची कसोटी असते. ह्याचाच जास्तीचा थकवा असतो.

पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडले की अहंकाराची शक्ति कमी होत जाते. त्या र्मैत्रित शब्दांचा प्रवास सुरु झाला की अधून मधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वताची लाज वाटते. पण इथेही पुन्हा शब्द विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड़,संकोच,अबोला.... ही एक एक वस्त्र उतरवली जातात..... फाटक कायमचे उघडले जाते.

वपुर्झा -- व. पु. काळे

No comments: