Thursday, February 2, 2012

निवडक हरितात्या



हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...
वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास  सनांच्या  गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...
हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !
प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते ?  हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही

माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..
पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...
एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पडलेल  पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..
या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा.

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..
चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला...... 




No comments: