पुण्यातील पेठान मधून फिरताना मी जरा भावूक होऊन जातो... सदाशिव , नारायण , शानिवारातील ते जुने दिवस समोर उभे राहतात ..काळा च्या ओघात पुसल्या गेलेल्या पण ओळखीच्या वाटणार्या खुणा शोधत .... ते जुने वाडे , गल्ल्या , बोळ मनात परत बांधत मी तासंतास मनसोक्त फिरतो ... ओळखीच्या चवी आणि ते तसेच ओळखीचे वाटणारे लोक भेटले कि देह भान विसरायला होते ..
दगडूशेठ संगीत उत्सवा च्या निमित्ताने असेच परत रामणबागेत जाण्याची संधी मिळाली आणि मी खाद्य भ्रमंती ला सुरवात केली ...
( ह्या पूर्वी ची खाद्य भ्रमंती, पुणेरी मिसळ , अमृततुल्य )
प्रभा विश्रांती गृह हे म्हणजे अस्सल पुणेरी दुकानाचा नमुना आहे ... मालकाला त्याच्या मालाचा प्रचंड अभिमान , येणारे गीर्हाईक हे केवळ आपला माल अद्वितीय आहे म्हणून येते हि खात्री .. कस्टमर सॅटीसफॅक्षन वैगरे क्षुल्लक बाजारी गोष्टीन कडे काना डोळा करत मस्त पैकी गल्ल्या वर बसणारे मालक बघायचे असतील तर प्रभा विश्रांती गृहा ला जरूर भेट द्यावी .. आवर्जून बटाटे वडा खावा ! मग आपल्याला समजतं कि चांगलं प्रोडक्ट असलं कि मालक का एवढा "माज " करू शकतो ते ! बटाट्या वड्या बरोबर पाव आणि रस्सा ..थोडी मिसळ .. जमलंच तर साबुदाणा वडा हे ओघाने आलेच ..
पूर्वी इथे बटाटा कचोरी मिळायची ती आता बंद केली आहे मालकाने ...ओलं खोबरं आणि बटाट्याचे आवरण असलेली हि कचोरी म्हणजे प्रभा विश्रांती गृहा चा ट्रेड मार्क होती !
रमण बागे कडून लक्ष्मी रस्ता ओलांडला कि कुमठेकर रस्त्या ला माझ्या लहानपणी एक खाद्य मेजवानी असायची .. पेशवाई .. सुजाता ..मधे विश्वेश्वराचं मंदिर ..दोन पाण्यानी भरलेले ..मोठ्ठे... मासे तरंगत असलेले दगडी हौद ..पुढे स्वीट होम ..
ह्या पैकी आता फक्त स्वीट होम उरलं आहे त्याच्या नव्या वेशात .. न्यू स्वीट होम ..इथलं इडली-सांबार शेव अजून हि ती जुनी चव टिकवून आहे ... इडली सांबार घेताना आवर्जून शेव प्लेट घ्या व सांबारा वर तवंग जरा कमी टाकायला सांगा.. शेवटी एक प्लेट दहीवडा खायला विसरू नका...
पुढे उजवी कडे वळल्या वर "श्री मिसळ" हे प्रसिद्ध खाऊ-ठिकाण आहे .. इथे काय काय म्हणून खाऊ असं होतं ... कोकणी ओल्या नारळाची चव इथल्या प्रत्येक पदार्थात आहे .. मिसळ , साबुदाणा वडा , रस्सा , आणि विशेष म्हणजे इथे मिळणारी हिरवी नारळ-मिरची ची चटणी ..
वरील पैकी कुठल्याच ठिकाणी चांगला चहा मिळत नसल्या मुळे ... चहा साठी .. पेरुगेट रस्त्या वरील ... नर्मदेश्वर , व्याडेश्वर पैकी कुठल्या "अमृततुल्यात " जाणं हे ओघाने आलेच ....
तोच रस्ता पुढे रमण बागे कडे घेवून येतो... खाण्या नंतर गाणं ऐकायला नको ?
आज आहे जसराज ... उद्या शौनक अभिषेकी .. आणि १ एप्रिल ला हृदयनाथ !