बंद केलेला ब्लॉग परत सुरु करावासा वाटला .. त्याचं एक कारण म्हणजे अंतर्मुख झाल्यावर आपल्याला आवडणाऱ्या / रुचणारया काही गोष्टी दिसल्या ... " अरे मला हि हेच म्हणायचं होतं " असं वाटलं कि मग ते किती आणि कोणाला सांगावं असं होऊन जातं .. अश्यावेळी ब्लॉग हा एकमेव सखा उरतो !
मुंबई ला मी २ वर्ष ..फार पूर्वी राहिलो .. के इ एम हॉस्पिटल ते वरळी सी फेस हा एवढाच काय तो रोजचा प्रवास.. काम करणारे अनेक सहकारी मात्र अगदी कल्याण,डोम्बिवली , ठाणे , विरार वरून परळ ला रोज सकाळी लोकल ट्रेन नी यायचे -जायचे .... म्हणून सुट्टी मिळेल तेव्हा ( शक्यतो शनिवार-रविवार ) मौज म्हणून लोकल ट्रेन नी फिरायचो ! तेव्हा मुंबई चं आकर्षण होतं .. "मुंबईकर" होणं सोपं असलं तरी फार काही आवडण्या सारखं नाही .. पुणेकरा ला तर नाहीच नाही ! आज कित्येक वर्षांनी माझ्या त्या "मुंबई कर " सहकाऱ्यांची भेट झाली .. आणि मुख्य म्हणजे ते आता पुणेकर होण्याचा प्रयत्न करत आहेत ! तेव्हा मी त्यांच्या बरोबर "शिवाजी पार्क" , "आझाद मैदान" , वानखेडे आणि ब्रेबोर्न वर क्रिकेट बघायला जायचो ... आता ते माझ्या बरोबर पी वाय सी , डेक्कन , पुना क्लब , नेहरू स्टेडियम आणि "गहुंजे" ला येतात ! मुंबईकर -पुणेकर हे वाद क्रिकेट बघत -बघत चालू ठेवले आहेत ! :)
ह्यावर पुलं नी लिहिलेलं काही ....
" मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला 'शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?' यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.
मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खर्या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट.कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच 'खेळ' मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे,पण मुंबईतल्या चाळीच्या ग्यालरीत टेस्ट म्याचेस वगैरे चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात ब्याट-बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.हि समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासात तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर ''अवो,ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली वो?'' असा प्रश्न विचारून एखाद्या पुणेकराला फेफड आणील.पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव,सवाई माधवराव,त्रिंबकी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी.विठ्ठल,पी.के.नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकीत फेकीत वाडेकर,सोलकर,हा आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळे येऊन पोहोचतात.तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर,'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर त्या क्वाडल्यामिरर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला.' हे वाक्य म्हणावं लागेल.
तात्पर्य, पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं 'पुणेरीपण' सुटलं नाही पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हळहळला.'साली निदान ती सहा नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती.' या उद्गारामागचा तो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही. "
पु. ल.
( पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर )
No comments:
Post a Comment