Tuesday, May 1, 2012

खादाड


मला  माझ्या देशातल्या पर्वत-नद्यां इतकाच खाद्य पदार्थांचा अभिमान आहे ! ज्याने  आयुष्यात मद्रास इडली खाल्ली नाही , ज्याने कधी मराठी पुरणपोळी चाखली नाही , ज्याला माहिमी हलवा माहीत नाही , मुंबईची भेल ज्याच्या पोटात गेली नाही , देवास- उज्जैन कडली रसभरी ज्यानं खाल्ली नाही , आग्र्याच पेठा म्हणजे काय आणि मथुरेची रबडी कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही , दिल्लीचा सोहन हलवा आणि कलकत्याचा रसगुल्ला , भावनगरी फरसाण ह्या मंडळींना जो ओळखत नाही त्यानं भारतीय संस्कृती बद्दल उगीच बोलू नये. जगाचा सत्यानाश या 'बद्धकोष्ठ ' झालेल्या लोकांनी केला आहे . भरपूर खाऊन मस्त ढेकर देणारा मनुष्य कधीही जगाचं वाईट करणार नाही . एक तर कुणाचं वाईट करायला लागणारी धडपड त्याला झेपणार नाही ; कारण पोटभर खाणं झाल्या वर लगेच घोरायला लागण्यात जी मजा आहे , त्याची तुलना कशाशीच कोणार नाही . पोटात ब्रम्ह गेल्यावर होणारां तो ब्रम्हानंद आहे आणि ब्रम्हानंदाची का कशाशी तुलना होते ?
ह्या ब्राम्हानन्दाच्या प्राप्तीसाठी खातो , भरपूर खातो . माझे मित्र म्हणतात, कि तु खाऊन खाऊन मरणार एखाद दिवशी . मी म्हणतो  , न खाऊन  मारण्यापेक्षा खाऊन मेलेलं काय वाईट ? आता अजिबात कधीच मरणार नाही असं जर कुणी सांगू लागला , कि तू खाऊ नकोस , अमर होशील , तर एक वेळ- पण नाहीच ! न खाता अमर राहण्यात तरी काय मौज आहे ? त्यापेक्षा खाऊन मेलेलंच बरं ! अन्नाचा अनादर करून जिवंत राहण्यापेक्षा  त्याचा आदर करत करत मृत्यूच्या  मुखात पडणं , ह्यात मृत्युला देखील जो काही आनंद होईल त्याची कल्पना माझ्या सारख्या खादाडालाच येईल. कारण मृत्यू हा म्हणजे अगदी खादाडां चाच  बादशहा. त्यानं आजवर खाल्लंय त्या मानान आम्ही काय खाल्लंय ?

(पुलं च्या एका रेडियो वरील भाषणातून )

No comments: