Wednesday, May 2, 2012

आनंद - अज्ञान


पोहता न येणार्या मुलांना पाण्याची भीती वाटते ; पण एकदा पाण्याशी मैत्री केली , ते पाणी आपण त्याच्यावर कसं हातपाय मारले असताना हवा तितका वेळ उचलून धरतं हे कळलं , कि सुट्टी लागल्या बरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो कि नाही ? सुरुवातीला जातं थोडं नाका तोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बारा सांगतोय ते कळतच नाही . अशां वेळी नाका तोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलत , तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर  मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही , तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.
मी कशाचा आनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ?  थोडासा जड वाटला ना शब्दप्रयोग ? तसा तो जड नाही. ' ' ज्ञान ' म्हणजे काही तरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करून दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे , " अरेच्च्या ! आपल्याला कळलं !"  असं वाटून होणारा आनंद ! मग तो एखाद्या यापूर्वी कधी नं कळलेल्या शब्दाचा असेल , न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.
विद्यार्थी म्हणजे तरी काय ? विद् म्हणजे जाणणे , कळणे ; अर्थी म्हणजे इच्छा असलेला . ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी . अज्ञान असणं यात काहीहि चूक नाही ; पण  अज्ञान लपावण्या सारखी  चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही .

(पुलं नी रेडियो वरून विद्यार्थ्यांना दिलेल्या एका भाषणा तून ) 

No comments: