Thursday, May 3, 2012

(अधिक)खाण्या विषयी थोडं

गाण्या प्रमाणे खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे . रागांना वर्ज्य बिर्ज्य स्वर असतात , तसे खाण्याला सुद्धा असतात. उदाहरणार्थ , श्रीखंड घ्या. बाकी , जोपर्यंत  मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तो पर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातय  म्हणा ! तर श्रीखंड . आता बागेश्री रागाला जसा पंचम वर्ज्य असतो तसंच पानात श्रीखंड असताना वर्ज्य काय याचा विचार केला पाहिजे. कितीही जबरदस्त खाणारा असला तरी त्याला ए "श्रीखंड पावाला लावून खा ," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरी सारखा गाव्हाचाच केलेला असतो ; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे . पाव आणि अंड्याचं आम्लेट हि जोडी शास्त्रोक्त आहे . पुरी आणी  आम्लेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत . जिलबी आणी  मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणी .... छे ! जिलबी ला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही . खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात , तसंच पदार्थांची कुठली गोत्र जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात . रागा प्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो . सकाळी थालीपीठ हि  बेचव वाटतं. मारवा राग जसा संधीकालातला , तसाच थालीपीठ देखील साधारणतः भीमपलास आणि पुरिया धनाश्री  या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं . सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणी संध्याकाळी साडेपाच - सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा!
बाहेर पाउस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत , तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दोन भजी खाल्ली तरी ती अधिक. पण बाहेर पाउस पडतो आहे , हवेत गारवा आहे , अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत . अधिकचं  हे असं आहे . लोकं भलत्या वेळी , भलत्या ठिकाणी आणी भलतं खातात . हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्यांचं पोट नव्हे , मुख्यतः डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणाऱ्यांची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणी चहावर धूम्र पान केलं पाहिजे. खाणयापिण्याचं ही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्र प्रगत होतंच पण शस्त्रवेत्ते हि होते. उपासाचं खाणं  देखील शोधून काढणारी ती  विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणार्या माणसान  इतकिच  उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत .
सारी भारतीय संस्कृती खाण्या भोवती गुंतली आहे; नव्हे टिकली आहे . होळीतून पोळी काढली कि उरतो फक्त शंखध्वनी . दिवाळी तून फराळ वगळा, नुसती  ओवाळणीची वसुली उरते. संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ  लावलेली बाजरीची भाकरी , वांग्याचं भरीत  आणि तिळगुळ आहे तो वर ' गोड गोड बोला', म्हणतील  लोकं . कोजागिरी पौर्णिमे तून आटीव केशरी दुध वगळा, उरले फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी स्वस्तात  मिळालेल्या उमेदवार गवयाचे गाणं. गणेश चतुर्थीला मोदक  नसले तर आरत्या कुठल्या भरवश्यावर  म्हणायच्या ? रामनवमीच्या सुंठवडा , कृष्णाष्टमीच्या दहि लाह्या , द्त्तापुढले पेढे , मारुतराया पुढलं साधं खोबरं अन खडीसाखर ... सारया  देवांची मदार या खाण्यावर आहे . समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन  भरपूर पचवणारं  राष्ट्र हि आहे. माणसं  एकदा खाण्यात गुंतली कि काही नाही तरी निदान वादुक बडबड तरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय ? आणि केव्हा ?  

(पुलं च्या रेडिओ वरील एका भाषणातून ) 

No comments: