Sunday, May 13, 2012

अनुबंध


कुठल्याही स्वतंत्र वृत्तीच्या कलावंताला आपण कुणाच्याही छाये खाली असावं किंवा कुणाकडून तरी उसन्या आणलेल्या कमाई वर आपण जगावं हि कल्पनाही नको असते. कलेच्या अवकाशात आपलं भला किंवा बुरा पण स्वतः चं असं स्वयंभूपण सर्वमान्य व्हावं हि त्याची सहज धारणा असते.
पण तो सुज्ञ असेल तर त्याला हे हि ठाऊक असतं कि ह्या आकाशा खाली संपूर्ण नवा असं काही जन्मत नाही. अनेक व्यक्ती , घटना , कलाकृती ह्यातून कळत - नकळत प्रेरणा  घेऊनच आपली वाटचाल सुरु होते आणि सुरु राहतेही . मात्र त्या पुर्वपरंपरांच्या  प्रेरणांमध्ये स्वतः च्या आयुष्याच्या रक्ता मासांमधून आणि त्यांनी दिलेल्या सर्वस्वी स्वतः च्या जाणिवांतून जन्मणारं जन्मणारा असं काहीतरी "स्व" मिसळावा लागता आणि त्यातून मग आपलं एक वेगळेपण सिद्ध हॉट राहतं...
इतकच नाही तर आपल्या आत जन्मलेल्या  जाणिवा ह्या हि केवळ आपल्याच असतात असं नाही ..
जुन्या काळाच्या कुठल्या तरी वळणावर त्याचं जाणिवा पुन: पुन्हा होणार असतात ...
काल आज नि उद्याही ...
त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या अनुबधातून आपल्याला सातत्याने काही ना काही मिळत असतं. आपल्याकडून हि उद्या ते  कुणाला तरी मिळणार असतं...

एका कलासक्त , मर्मग्राही , सर्जनशील मनाने  आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या अनुबंधान्चा घेतलेला एक रसज्ञ  वेध !

"अनुबंध"   कवी सुधीर मोघे 

Thursday, May 3, 2012

(अधिक)खाण्या विषयी थोडं

गाण्या प्रमाणे खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे . रागांना वर्ज्य बिर्ज्य स्वर असतात , तसे खाण्याला सुद्धा असतात. उदाहरणार्थ , श्रीखंड घ्या. बाकी , जोपर्यंत  मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तो पर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातय  म्हणा ! तर श्रीखंड . आता बागेश्री रागाला जसा पंचम वर्ज्य असतो तसंच पानात श्रीखंड असताना वर्ज्य काय याचा विचार केला पाहिजे. कितीही जबरदस्त खाणारा असला तरी त्याला ए "श्रीखंड पावाला लावून खा ," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरी सारखा गाव्हाचाच केलेला असतो ; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे . पाव आणि अंड्याचं आम्लेट हि जोडी शास्त्रोक्त आहे . पुरी आणी  आम्लेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत . जिलबी आणी  मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणी .... छे ! जिलबी ला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही . खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात , तसंच पदार्थांची कुठली गोत्र जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात . रागा प्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो . सकाळी थालीपीठ हि  बेचव वाटतं. मारवा राग जसा संधीकालातला , तसाच थालीपीठ देखील साधारणतः भीमपलास आणि पुरिया धनाश्री  या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं . सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणी संध्याकाळी साडेपाच - सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा!
बाहेर पाउस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत , तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दोन भजी खाल्ली तरी ती अधिक. पण बाहेर पाउस पडतो आहे , हवेत गारवा आहे , अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत . अधिकचं  हे असं आहे . लोकं भलत्या वेळी , भलत्या ठिकाणी आणी भलतं खातात . हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्यांचं पोट नव्हे , मुख्यतः डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणाऱ्यांची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणी चहावर धूम्र पान केलं पाहिजे. खाणयापिण्याचं ही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्र प्रगत होतंच पण शस्त्रवेत्ते हि होते. उपासाचं खाणं  देखील शोधून काढणारी ती  विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणार्या माणसान  इतकिच  उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत .
सारी भारतीय संस्कृती खाण्या भोवती गुंतली आहे; नव्हे टिकली आहे . होळीतून पोळी काढली कि उरतो फक्त शंखध्वनी . दिवाळी तून फराळ वगळा, नुसती  ओवाळणीची वसुली उरते. संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ  लावलेली बाजरीची भाकरी , वांग्याचं भरीत  आणि तिळगुळ आहे तो वर ' गोड गोड बोला', म्हणतील  लोकं . कोजागिरी पौर्णिमे तून आटीव केशरी दुध वगळा, उरले फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी स्वस्तात  मिळालेल्या उमेदवार गवयाचे गाणं. गणेश चतुर्थीला मोदक  नसले तर आरत्या कुठल्या भरवश्यावर  म्हणायच्या ? रामनवमीच्या सुंठवडा , कृष्णाष्टमीच्या दहि लाह्या , द्त्तापुढले पेढे , मारुतराया पुढलं साधं खोबरं अन खडीसाखर ... सारया  देवांची मदार या खाण्यावर आहे . समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन  भरपूर पचवणारं  राष्ट्र हि आहे. माणसं  एकदा खाण्यात गुंतली कि काही नाही तरी निदान वादुक बडबड तरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय ? आणि केव्हा ?  

(पुलं च्या रेडिओ वरील एका भाषणातून ) 

Wednesday, May 2, 2012

आनंद - अज्ञान


पोहता न येणार्या मुलांना पाण्याची भीती वाटते ; पण एकदा पाण्याशी मैत्री केली , ते पाणी आपण त्याच्यावर कसं हातपाय मारले असताना हवा तितका वेळ उचलून धरतं हे कळलं , कि सुट्टी लागल्या बरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो कि नाही ? सुरुवातीला जातं थोडं नाका तोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बारा सांगतोय ते कळतच नाही . अशां वेळी नाका तोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलत , तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर  मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही , तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.
मी कशाचा आनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ?  थोडासा जड वाटला ना शब्दप्रयोग ? तसा तो जड नाही. ' ' ज्ञान ' म्हणजे काही तरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करून दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे , " अरेच्च्या ! आपल्याला कळलं !"  असं वाटून होणारा आनंद ! मग तो एखाद्या यापूर्वी कधी नं कळलेल्या शब्दाचा असेल , न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.
विद्यार्थी म्हणजे तरी काय ? विद् म्हणजे जाणणे , कळणे ; अर्थी म्हणजे इच्छा असलेला . ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी . अज्ञान असणं यात काहीहि चूक नाही ; पण  अज्ञान लपावण्या सारखी  चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही .

(पुलं नी रेडियो वरून विद्यार्थ्यांना दिलेल्या एका भाषणा तून ) 

Tuesday, May 1, 2012

खादाड


मला  माझ्या देशातल्या पर्वत-नद्यां इतकाच खाद्य पदार्थांचा अभिमान आहे ! ज्याने  आयुष्यात मद्रास इडली खाल्ली नाही , ज्याने कधी मराठी पुरणपोळी चाखली नाही , ज्याला माहिमी हलवा माहीत नाही , मुंबईची भेल ज्याच्या पोटात गेली नाही , देवास- उज्जैन कडली रसभरी ज्यानं खाल्ली नाही , आग्र्याच पेठा म्हणजे काय आणि मथुरेची रबडी कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही , दिल्लीचा सोहन हलवा आणि कलकत्याचा रसगुल्ला , भावनगरी फरसाण ह्या मंडळींना जो ओळखत नाही त्यानं भारतीय संस्कृती बद्दल उगीच बोलू नये. जगाचा सत्यानाश या 'बद्धकोष्ठ ' झालेल्या लोकांनी केला आहे . भरपूर खाऊन मस्त ढेकर देणारा मनुष्य कधीही जगाचं वाईट करणार नाही . एक तर कुणाचं वाईट करायला लागणारी धडपड त्याला झेपणार नाही ; कारण पोटभर खाणं झाल्या वर लगेच घोरायला लागण्यात जी मजा आहे , त्याची तुलना कशाशीच कोणार नाही . पोटात ब्रम्ह गेल्यावर होणारां तो ब्रम्हानंद आहे आणि ब्रम्हानंदाची का कशाशी तुलना होते ?
ह्या ब्राम्हानन्दाच्या प्राप्तीसाठी खातो , भरपूर खातो . माझे मित्र म्हणतात, कि तु खाऊन खाऊन मरणार एखाद दिवशी . मी म्हणतो  , न खाऊन  मारण्यापेक्षा खाऊन मेलेलं काय वाईट ? आता अजिबात कधीच मरणार नाही असं जर कुणी सांगू लागला , कि तू खाऊ नकोस , अमर होशील , तर एक वेळ- पण नाहीच ! न खाता अमर राहण्यात तरी काय मौज आहे ? त्यापेक्षा खाऊन मेलेलंच बरं ! अन्नाचा अनादर करून जिवंत राहण्यापेक्षा  त्याचा आदर करत करत मृत्यूच्या  मुखात पडणं , ह्यात मृत्युला देखील जो काही आनंद होईल त्याची कल्पना माझ्या सारख्या खादाडालाच येईल. कारण मृत्यू हा म्हणजे अगदी खादाडां चाच  बादशहा. त्यानं आजवर खाल्लंय त्या मानान आम्ही काय खाल्लंय ?

(पुलं च्या एका रेडियो वरील भाषणातून )