‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषि रक्त
आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा’
कवी आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर ( ८ मार्च १९३० - २६ एप्रिल १९७६ ).
त्यांचे बालपण कुडाळ आणि बागलांची वाडी या निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत झाले. १९५९ साली ते मुंबईला आले. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा सर्वच साहित्यप्रकारांत लक्षवेधी लेखन केले. कवितालेखनासाठी त्यांनी ‘आरती प्रभू’ हे नाव घेतले.
आरती प्रभू हे नाव कसे घेतले याला पाश्र्वभूमी आहे. त्यांनी ‘प्रभू-खानोलकर’ या आडनावातील ‘प्रभू’ हे आडनाव घेतले. घरी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने हाक मारीत. त्या नावातील रोमन लिपीतील ‘आर’ आणि ‘टी’ ही अक्षरे त्यांनी घेतली आणि त्यातून ‘आरती प्रभू’ हे नाव तयार केले.
कवी आरती प्रभू हे शालेय जीवनापासूनच कविता लिहीत. ‘बालार्क’ या शालेय हस्तलिखितात ‘पुष्पकुमार’ या नावाने त्यांनी काही कविता लिहिल्या. ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘शून्य शृंगारते’ ही त्यांची कविता ‘आरती प्रभू’ या नावाने प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘कोंडुरा’, ‘रात्र काळी घागर काळी’ या कादंबऱ्या मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक ‘रंगायन’ या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. १९६२ मध्ये त्यांचा ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘चानी’ ही त्यांची कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की व्ही. शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला. खानोलकरांनी ‘कालाय तस्मै नम:’ आणि ‘असाही एक अश्वत्थामा’ ही नाटकेही लिहिली.
काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगांवकर यांच्यासोबत काम केले. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली.
१९७८ साली आरती प्रभूंच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही.
भावगीतांमध्ये ‘ती येते आणिक जाते..’, ‘ये रे घना, ये रे घना..’, ‘समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते..’ ही त्यांची गाणी अफाट लोकप्रिय झाली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी ते गेले. (२६ एप्रिल १९७६)
मराठी विकी पृष्ठ :
कविवर्य वसंत बापट यांच्या शब्दात..
‘तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल अपुली अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कधीतरी पटदिशी..’
----------------------------------------------------------------------------------------
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
अंत झाला अस्ता आधी , जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजेकुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
आरती प्रभू
संगीत : भास्कर चंदावरकर
स्वर : रवींद्र साठे
No comments:
Post a Comment