हा ब्लॉग सुरु करण्याचं कारण होतं .. देवनागरीत / मराठीत काहीतरी लिहावं आणि आपल्या लोकांशी मैत्रीची नाळ जुळावी ... ती साध्य झाली असं वाटतय ... फक्त ह्या ब्लॉग मुळेच अनेक मित्र मिळाले ..भेटले ...मनाच्या गाठी जुळल्या... ब्लॉग अपडेट का केला नाही म्हणून अनेक लोकांनी इ -मेल केले , फोन केले ह्यात त्यांच्या प्रेमाची पोच मिळाली ... शतशः धन्यवाद !
गुगल एनालीटीक्स प्रमाणे गेल्या ६ महिन्यात ३८९९३ "विजिटर्स" आले आणि हि ट्राफिक " मराठी ब्लॉग विश्व डॉट नेट " व " गुगल " नी "पाठवली " .. असो .. त्या सर्वांचे आभार !
८ नोव्हेंबर (पु लं जयंती ) ते १२ जून ( पु लं पुण्यतिथी ) .. रोज काहीतरी लिहिण्याचा नेम केला होता ...रोज काही जमलं नाही ..पण जमलं तसं लिहिलं .. पहिल्या दिवशी च्या मानाने आज देवनागरी बरी जमते आहे ! :)
मनातलं काहीतरी ...
अनेक बरे वाईट अनुभव आले ... बरे जास्त ... वाईट थोडेच ! :) १२-१५ वर्षात पुणे किती बदललय हे जाणवलं ! जसे भामटे भेटले तसेच जीव ओवाळून टाकावी अशी माणसं हि भेटली ! :)
मी पुण्यात वाढलो असलो तरी मराठी शाळेत कधी गेलो नाही .. माझी शाळा : केंद्रीय विद्यालय .. त्यामुळे लहानपणी पासूनच हिंदी आणि इंग्रजी शी एकदम गट्टी जमली ... एक प्रकारे ते चांगलंच झालं .. देशभरातील अनेक मित्र झाले .. पुढे विदेशात हि जुळवून घेयला त्रास झाला नाही !
मी स्वतः आयुष्यात मराठी कधीही शिकलो नाही .. अगदी " ग म भ न " सुद्धा नाही .. " गमभन " शिकलो ते एकदम कॉम्पुटर वर देवनागरी लिहिण्या साठी .... :)
माझं " मराठी पण " हे माझ्या "सदाशिव- नारायण -शनिवार " पेठे तील लहानपणातच मला गवसले. "भावे हायस्कूल - नुमवि - रमणबागे " मध्ये जाणारे मित्र आणि "हुजूरपागा - अहिल्यादेवी " मध्ये जाणाऱ्या मैत्रिणीं .. ह्यांनीच मला मराठीपण दिलं.
माझं " मराठी " शिक्षण झालं ते केवळ घरातल्या बोली भाषेचं आणि पुढे .. पुलं-वपु-गदिमा ह्यांच्या लेखणीतून ! सर्वात मोठा हातभार लावला तो म्हणजे "स . प महाविद्यालया " नी . अकरावी पर्यंत " देढ-गुजरी " असलेला मी .. बारावी संपेस्तोवर "परशुरामीय" मध्ये दोन लेख प्रकाशित करू शकलो ! पुढे बी . जे वैद्यकीय महाविद्यालया नी हि मराठी पण जोपासले ते "बैजेमिक " च्या मराठी विभागाने आणि " आर्ट-सर्कल " नी ! :)
अनेक वर्षे पुण्याच्या बाहेर राहिल्या नंतर ...पुण्यात येऊन " जुळवून " घेण्यात ह्या ब्लॉग लिखाणा नी खूप मदत केली ! योगायोग असा कि ... आज ११ ऑगस्ट ... ११ ऑगस्ट ९५ ला मी पुणे सोडून मुंबई ला के इ एम हॉस्पिटल ला गेलो होतो ... आणि पुढे ह्याच ऑगस्ट च्या १४ तारखेला १९९८ मध्ये भारताला अलविदा केला होता ! :)
आज मी ह्या ब्लॉग ला अलविदा करत आहे ..जोडलेले अनेक मित्र - मैत्रिणी जवळ आहेत ..ते रहातीलच ! :)
भेटू असेच परत ..कधीतरी !
अल - विदा !